कल्याण-डोंबिवलीत ऑपरेशन लोटसला शिंदे स्टाईल उत्तर, मनसेला मिळणार हे महत्त्वाचे पद
कल्याण-डोंबिवलीत ५० जागा जिंकूनही भाजपची कोंडी झाली असून, शिंदे गटाने ५३ नगरसेवक आणि मनसेच्या पाठिंब्याच्या जोरावर महापौरपदावर दावा ठोकला आहे. ठाकरे गटातील नगरसेवकांच्या संभाव्य बंडखोरीमुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता समीकरणाची जुळवाजुळव सुरु झाली आहे. या सत्ता समीकरणाने वेगळे वळण घेतले आहे. केडीएमीत भाजपने ५० जागा जिंकून निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राइक रेट राखला होता. पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मनसे आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन महापौरपदावर आपला दावा अधिक मजबूत केला आहे. महायुतीत सोबत असूनही भाजपने कमी पदांवर समाधान मानावे, अशी रणनीती शिंदे गटाने आखल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
कल्याण डोंबिवलीत महापालिका निवडणुकीच्या निकालानतंर अनेक समीकरणं बदलली आहेत. तसेच सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. कल्याण-डोंबिवलीत एकूण १२२ जागांपैकी बहुमतासाठी ६२ हा आकडा आवश्यक आहे. यानुसार शिवसेना शिंदे गटाला ५३ जागा, भाजपला ५० जागा, मनसेला ५ जागा, शिवसेना ठाकरे गटाला ११ जागा मिळाल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे ४ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकण भवनात ५३ नगरसेवकांची नोंदणी करून आपला स्वतंत्र गट अधिकृत केला आहे. याच वेळी मनसेचे ५ नगरसेवकही त्यांच्यासोबत दिसल्याने शिंदे-मनसे युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले असले तरी, त्यापैकी स्वप्नील केणे आणि राहुल कोट यांसारखे महत्त्वाचे चेहरे मनसेच्या गोटात सामील झाल्याने ठाकरे गटाची संख्या घटली आहे. याशिवाय आणखी दोन नगरसेवक बेपत्ता असून ते थेट शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. यामुळे ठाकरे गटाने कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेत आपल्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार ठेवली आहे.
महायुतीचाच महापौर होईल
भाजपने ५४ जागा लढवून ५० जागा जिंकल्या, जो या निवडणुकीतील सर्वाधिक यशस्वी दर आहे. मात्र, शिंदे गटाने मनसेला महत्त्वाचे पद कदाचित उपमहापौर किंवा स्थायी समिती देऊ केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. महायुतीचाच महापौर होईल, आम्ही भाजपला बाहेर ठेवणार नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले असले तरी, सत्तेचे मुख्य केंद्र स्वतःकडे ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न उघड झाला आहे.
सध्या महापौरपदासाठी शिंदे गटातून निलेश शिंदे आणि दिपेश म्हात्रे यांची नावे प्रबळ मानली जात आहेत. तर भाजपने अद्याप अधिकृतपणे कोणाचेही नाव पुढे केलेले नाही. आगामी २-३ दिवसांत एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतर सत्तेचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
