नवी मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र; गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (maha vikas aghadi melava in navi mumbai)

  • हर्षल पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 13:13 PM, 17 Jan 2021
नवी मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र; गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार?

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते आज नवी मुंबईत एकत्र आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी गेल्या 20 वर्षांपासूनच्या भाजप नेते गणेश नाईक यांच्या पालिकेतील सत्तेला हादरा देणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (maha vikas aghadi melava in navi mumbai)

वाशीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने काँग्रेस नेते अस्लम शेख, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार राजन विचारे आदी नेते या मेळाव्यात उपस्थित आहेत. या निमित्ताने विजय नाहटा यांची पर्यावरण प्राधिकरणाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने अस्लम शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीचा नवी मुंबईतील हा पहिलाच मेळावा आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. आता नवी मुंबई महापालिकेतही त्याची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उट्टं काढणार?

राज्यात 2014 पासून भाजपची लाट आल्याने अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत नवी मुंबई महापालिकेतील 52 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसह एकत्र उतरून नाईक यांना नामोहरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यात महाविकास आघाडीला कितपत यश मिळेल हे निवडणूक निकालानंतरच समजणार आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने नाईकांसमोर पहिल्यांदाच तगडं आव्हान उभं राहिल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

बंडखोरी होणार नाही

आम्ही एक वर्षापूर्वीच नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली होती. पण कोरोनामुळे ती वाया गेली. पण आता महाविकास आघाडी सक्षमपणे मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होईल? बंडखोरी होईल, असं विरोधकांना वाटत आहे. पण तसं काही होणार नाही, असं विजय नाहटा यांनी सांगितलं. आमच्यात कोणतेही वाद नाहीत. ही महाविकास आघाडीची मोठी ताकद असल्याचं नाहटा यांनी स्पष्ट केलं. व्हॅकन्सी असेल तरच इतरांना आघाडीत प्रवेश दिला जाईल, नाही तर नाही, असंही ते म्हणाले. (maha vikas aghadi melava in navi mumbai)

 

संबंधित बातम्या:

Breaking | केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

LIVE | नामांतरापेक्षा विकासावर चर्चा व्हावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा शिवसेनेला टोला

(maha vikas aghadi melava in navi mumbai)