ज्ञानेश्वरी मुंडेंनी फडणवीसांची भेट घेताच वेगवान घडामोडी, महादेव मुंडे हत्याप्रकरणात मोठी बातमी
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, त्यानंतर आता महादेव मुंडे हत्याप्रकरणातील तपासाला वेग आला आहे.

परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या गोट्या गित्तेच्या शोधासाठी एसआयटी पथकं रवाना झाले आहेत. गोट्या गित्तेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बीड जिल्ह्यात चर्चा आहे, मात्र अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये.
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या टीम बीडमधून रवाना झाल्या आहेत. गोट्या गित्ते हा मकोकातील आरोपी असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता तपासाला वेग आल्याचं दिसत आहे.
संशयित आरोपी असलेल्या गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकं रवाना झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांनी दिली आहे. गोट्या गित्तेच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना कधीपर्यंत यश येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात कालपासून गोट्या गित्ते याला पुण्यातून ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत ताब्यात घेतले नसून, त्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी बीडमधून काही पथकं रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची देखील भेट घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.
वाल्मिक कराडवर आरोप
दरम्यान या प्रकरणावर बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड याच्या दबावामुळे पोलिसांनी तपास केला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं, पण त्यांनी लक्ष घातलं नसल्यानं खेद वाटतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
