उद्धव ठाकरेंवर धर्मसंकट? एकाच मतदारसंघात दोन निष्ठावंतांचा दावा, कोणाला संधी मिळणार?
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विधानसभा जागांसाठी इच्छुक उमेदवारांची मातोश्रीवर बैठक घेतली. भायखळा, शिवडी, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर आणि मागाठाणे यासारख्या जागांवर एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
Maharashtra Assembly Elections 2024 : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी फार वेगाने घडत आहे. यंदा विधानसभेची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी यांच्यात होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघांमध्ये येत्या २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणुकांचा निकाल समोर येईल. त्यातच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर होत आहेत. काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून लवकरच उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. यानिमित्ताने आज मुंबईतील जागांबद्दल ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांची मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तिढा असलेल्या जागांच्या उमेदवारांशीही संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी आज मुंबईतील ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक पार पडली. यात ठाकरे गटाच्या वाटेला आलेल्या मुंबईतील मतदारसंघांबद्दल चर्चा करण्यात आली. यात चेंबूर, शिवडी, भायखळा, कुर्ला, मागाठाणे, घाटकोपर या जागांवर एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी उमेदवारांशी चर्चा करून याबद्दल ठरवू असे सांगितले.
ठाकरे गटातील इच्छुक उमेदवार आणि मतदारसंघ
भायखाळा – रमाकांत रहाटे आणि मनोज जामसुतकर
शिवडी – अजय चौधरी, सुधीर साळवी
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर अनिल पाटणकर
कुर्ला- प्रवीणा मोरजकर,
घाटकोपर – सुरेश पाटील, संजय भालेराव
मागाठाणे – संजय गाडी, उदेश पाटेकर
तीन जागांवरील तिढा आज सुटणार
मुंबईतील चेंबूर, शिवडी आणि भायखळा या तीन जागांवरील तिढा आज सुटणार आहे. मातोश्रीवर याबद्दल एक बैठक बोलवण्यात आली आहे. यात सध्याचे विद्यमान आमदार अजय चौधरी आणि आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यासोबतच भायखळा आणि शिवडी विधानसभेतील इच्छुकांना देखील मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं. शिवडी विधानसभेतून सुधीर साळवी, तर भायखळा विधानसभेत किशोरी पेडणेकर, मनोज जामसूतकर, रमाकांत रहाटे या इच्छुकांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे.
आतापर्यंत सर्व विद्यमान आमदारांना तयारीला लागण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या, त्यासंबंधित त्यांना मातोश्रीवर देखील बोलावण्यात आलं होतं. तसेच भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाची रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी द्या, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली.
परंडा विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटावी व या मतदारसंघातून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी द्यावी या मागणीसाठी परंडा भूम वाशी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांना भेटले. माजी आमदार कै. ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी परंडा मतदार संघाचे दोन टर्म आमदार म्हणून काम केले होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला रणजित पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी परंडा मतदारसंघातील कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना भेटले.
इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांशी उद्धव ठाकरेंशी चर्चा
तसेच मुंबईतील विविध विधानसभांच्या बैठका आज मातोश्रीवर पार पडत आहेत. आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यासह विविध विधानसभांचे कार्यकर्ते आणि नगरसेवक येत आहेत. चेंबूर विधानसभेच्या उमेदवारांची आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. यावेळी अनिल पाटणकर, प्रकाश फातर्पेकर दाखल झाले आहे. विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकरांच्या जागी आपल्याला उमेदवारी द्या, असा चंग अनिल पाटणकर यांनी केला आहे. त्यामुळे एकाच जागेवर इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली.
मुंबई लालबाग- शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते अजय चौधरी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण याच मतदारसंघातून सुधीर साळवी यांनी दावा केला आहे. त्यामुळे अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे मातोश्रीवरील बैठकीसाठी उपस्थित होते.