AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणशी वाकडं, चुलीत लाकडं… आजही राज्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा… तुमचं शहर, जिल्हा, तालुक्याची परिस्थिती काय? वाचा…

इराण-अमेरिका युद्धाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. ठाणे, सोलापूर, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांत हॉटेल आणि मिठाई व्यवसाय ठप्प झाले आहेत, तर अनेकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांसाठी चिंतेची बाब आहे.

इराणशी वाकडं, चुलीत लाकडं... आजही राज्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा... तुमचं शहर, जिल्हा, तालुक्याची परिस्थिती काय? वाचा...
राज्यात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 13, 2026 | 11:38 AM
Share

इराणशी वाकडं तर चुलीत लाकडं अशी पूर्वी म्हण होती. त्याचं कारण म्हणजे तेलासाठी संपूर्ण जग इराणवर अवलंबून आहे. जर इराणशी पंगा घेतला तर आपल्याला स्टोव्ह ऐवजी चुली पेटव्याव्या लागतील, असं पूर्वीच्या काळी वाटायचं. आज जगाने खूप प्रगती केली. अनेक आधुनिक तंत्रज्ञान आले. इंटरनेटचं युग आलं. चंद्रावरच्या मोहिमा झाल्या. मंगळाकडेही मानव झेपावला. पण इराणवरचं अवलंबित्व काही कमी करू शकला नाही. इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धाने पुन्हा एकदा हेच सिद्ध झालंय. या युद्धाचा सर्वाधिक फटका विकसनशील आणि गरीब देशांना झाला आहे. भारताने जपानला मागे टाकत चौथी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे. आता भारताची झेप तिसरी अर्थव्यवस्था होण्याकडे आहे. पण या युद्धामुळे सर्वच गणित बिघडताना दिसत आहे. भारतातही पेट्रोल आणि गॅस सिलेंडरची कमतरता भासत आहे. एक सिलेंडर मिळावं म्हणून देशातील नागरिक रस्त्यावर आले आहेत. एजन्सीच्या बाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत. आज चौथ्या दिवशीही हेच चित्र आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक शहर, जिल्हा, तालुक्यात हेच चित्र पाहायला मिळत आहे.

ठाणे :

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये ठाणे महानगरपालिका टीएमटी आगारात असणारे कॅन्टीन गॅस कमतरतेमुळे बंद करण्यात आले आहे. अनेक टीएमटी आगारातील कर्मचारी आणि कामगार या कॅन्टीगमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ पोटाची उपजीविका भागवत असतात. तसेच टीएमटी परिवाहनचे मोठं कार्यालय देखील या ठिकाणी असल्यामुळे अनेक कर्मचारी यांना आता दररोज न चुकता घरातूनच नाष्टा आणि जेवण घ्यावे लागणार आहे.

या टंचाईमुळे ठाण्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गॅस शिल्लक नसल्यामुळे कमीच पदार्थ हॉटेलमध्ये बनवले जात आहेत. हॉटेल व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांना सकाळच्या नाश्त्यालाही मुकावे लागणार आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे आज हॉटेल बंद करावे लागेल. ठाण्यातील 30 टक्के हॉटेल बंद होतील, अशी प्रतिक्रिया हॉटेल चालकांनी दिली आहे.

रत्नागिरी :

रत्नागिरीत गॅस एजन्सिच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरातील विविध गँस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. घरगुती गॅस मिळण्यासाठी रत्नागिरीकरांची गॅस एजन्सीच्या बाहेर मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. गॅस वितरणाचे नियम बदल्याने आता अनेक ठिकाणी हमरातुमरीवर येण्याचे प्रसंगही दिसत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक गॅस एजन्सी चालकांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. गॅस एजन्सीच्या मागणीनुसार आता पुढचे काही दिवस गॅस एजन्सीच्या बाहेर पोलिस बंदोबस्त राहणार आहे. पोलिस आणि होमगार्ड यांचे चार जणांचे पथक गॅस एजन्सीच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत.

शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर जवळपास 200 ग्राहक एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत. सलग सहाव्या दिवशी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहक घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी धावा धाव सुरू आहे. 20- 20 दिवस बुकिंग करून सुद्धा घरगुती सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहक गॅस एजन्सीच्या बाहेर उभे आहेत.

सोलापूर :

सोलापुरात गॅसच्या तुटवड्यामुळे चुलीवर पदार्थ शिजवण्याची हॉटेल चालकांवर वेळ आली आहे. गॅसच्या तुटवड्यानंतर लाकडाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे लाकडाचे दरही वाढले आहेत. एक मन लाकडामागे शंभर रुपयांची वाढ झाल्याचे हॉटेल व्यवसायिकांनी सांगितलं. सोलापुरातील अनेक हॉटेल व्यवसायिक गॅस तुटवड्यामुळे लाकडाला पसंती देत आहेत. दरम्यान सरकारने सणाच्या कालावधीमध्ये गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हॉटेल व्यवसायिक मुस्तफा जमादार, आरिफ रंगरेज यांनी केली आहे.

बारामती :

युद्धामुळे बारामती शहरातील सुमारे 400 व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले असून ‘बारामती व्यापारी महासंघा’ने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांना निवेदनाद्वारे संकट दूर करण्याचे साकडे घातले आहे. शहरात 250 हॉटेल्स, 60 मिठाईची दुकाने आणि इतर 100 बार व्यावसायिक आहेत. सध्या गॅस मिळणे कठीण झाल्याने व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. “जर दर एक दिवसाआड सिलेंडरचा पुरवठा झाला नाही, तर याच आठवड्यात सर्व हॉटेल्स आणि मिठाईची दुकाने बंद ठेवावी लागतील,” असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असेही पत्रात नमूद केले आहे. प्रशासनाने याप्रश्नी तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

पंढरपूर :

पंढरपूर शहरातील हॉटेल आणि स्वीट मार्ट व्यवसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मोठा फटका बसू लागला आहे. गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेलमध्ये नवीन पदार्थ बनवणे बंद करण्यात आले आहे मिठाई आणि स्वीट मार्टमध्येही हीच परिस्थिती असून गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे नवीन मिठाई तयार करण्याचे काम ठप्प झाले आहे. विविध राज्यांतून आणलेले कामगार सध्या कामाविना बसून आहेत. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोविड काळातील परिस्थितीची आठवण करून देणारी ही परिस्थिती निर्माण झाली असून व्यावसायिक गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल आणि स्वीट मार्ट व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस तुटवड्याचा परिणाम आता थेट हॉटेल व्यवसायावर दिसू लागलाय. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे शहरातील अनेक छोट्या-मोठ्या हॉटेलचे शटर डाऊन झाले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही ठिकाणी कामगारांना बसून राहण्याची वेळ आली असून अनेक डोसा सेंटर मागील दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. हॉटेल चालकांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी गॅसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून सरकारकडे करण्यात येत आहे.

शहरात गॅस बुकिंगसाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ॲप बंद पडल्यामुळे नागरिकांना थेट गॅस एजन्सीवर जाऊन बुकिंग आणि पावती घ्यावी लागत आहे. त्यामुळे एपीआय कॉर्नर परिसरातील भारत व्यंकटेश गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरपर्यंत रांग लागल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.

लातूर :

लातूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला आहे, आरोग्य आणि शिक्षण संस्थांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्याचे प्रशासनाने ठरवलेले आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना मात्र गॅस पुरवठा करण्यात येणार नसल्याने हॉटेल इंडस्ट्री बंद पडण्याच्या मार्गावर आहे. हॉटेल चालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र पर्याय निघालेला नाही.

बुलढाणा :

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याने सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची बुकिंग 45 दिवसावर केल्याने आता ग्रामीण भागातील गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आज सिलेंडर बुक केल्यानंतर ते 45 दिवसानंतर मिळणार असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहक संतापले असून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

धाराशिव

व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी पर्यायी इंधनाचा वापर सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अनेक मोठ्या हॉटेलमध्ये आता लाकूड फोडून तसेच शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करून स्वयंपाक केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना पारंपरिक पद्धतीकडे वळावे लागत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम होत आहे.

नागपूर :

नागपुरात आजही गॅस सिलेंडर साठी लागली नागरिकांची लांब लाईन लागली आहे. गॅस एजन्सी उघडण्याच्या आधी पासूनच नागरिकांनी फक्त एका सिलेंडरसाठी मोठी लाईन लावली आहे. प्रशासनाने गॅसचा तुटवडा नसल्याचं वारंवार सांगून सुद्धा नागरिकांच्या रांगा लागत आहेत. सिलेंडरची उपलब्धता आहे, मात्र ऑनलाईन नंबर लावण्यात अडचणी येत आहेत. ओटीपी शिवाय घरपोच सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे सिलेंडरच्या चिंतेत नागरिक स्वतःच एजन्सी मध्ये सिलेंडर घेण्यासाठी पोहचत आहेत.

भंडारा :

पेट्रोकेमिकल पदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता लहान-मोठ्या उद्योगांवर दिसून येत आहे. कच्चा माल महागल्यामुळे प्लास्टिक बॉटल पॅकेजिंगचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे डीलर आणि डिस्ट्रीब्युटर यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. ग्राहकांवर तात्काळ भार पडत नसला तरी पुरवठा साखळीतील इतर घटकांवर आर्थिक ताण वाढला आहे.

इराण-इस्त्राईल व अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जागतिक पेट्रोकेमिकल बाजारावर होत असून त्याची झळ भंडारा जिल्ह्यातील उद्योगांनाही बसत आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या दरांमुळे अनेक उद्योग आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही उद्योग तात्पुरते बंद झाले असून अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे स्थानिक उद्योजकांनी सांगितले आहे. उद्योग क्षेत्रात यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहिल्यानगर :

आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट अहिल्यानगरमधे पहायला मिळत आहे. शहरात रिक्षासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षाचालकांना गॅससाठी चक्क 2-2 किलोमीटरच्या रांगेत उभं राहावं लागत आहे. अहिल्यानगर शहरात तिन एलपीजी पंप आहेत. त्यातील दोन पंप एलपीजी शिल्लक नसल्याने बंद आहेत. यामुळे सगळा ताण बोल्हेगाव येथील एकमेव पंपावर आला आहे. बोल्हेगाव रस्त्यावर दोन्ही बाजूंनी रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी 2 ते 3 तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. रिक्षाचालकांचा अर्धा दिवस आता गॅसच्या रांगेतच जात आहे. रांगेत उभे राहिल्यामुळे हाताला मिळणारा रोजगार बुडत असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तुम्हाला भाव वाढवायचे असतील तर खुशाल वाढवा, पण किमान गॅस तरी वेळेवर उपलब्ध करून द्या अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

नाशिक :

नाशिक शहरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा परिणाम आता थेट चहाच्या टपऱ्यांवर दिसू लागला आहे. गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत नसल्याने आणि वाढत्या खर्चामुळे अनेक चहा विक्रेत्यांनी आता कोळशाचा पर्याय स्वीकारला आहे. शहरातील अनेक टपऱ्यांवर सध्या कोळशावर चहा तयार केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅसच्या तुलनेत कोळसा स्वस्त पडत असल्याने तसेच छोट्या जागेत पारंपरिक चूल करणे शक्य नसल्यामुळे विक्रेत्यांनी कोळशाचा वापर सुरू केला आहे.

नाशिकमधील उपासाच्या साबुदाणा वड्यांसाठी प्रसिद्ध असलेले सायंतारा हॉटेल गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे तात्पुरते बंद करण्याची वेळ मालकांवर आली आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध होत नसल्याने हॉटेल प्रशासनाने हॉटेल बाहेर ‘बंद’चा फलक लावला आहे. उपासाच्या पदार्थांसाठी शहरभर ओळख असलेल्या या हॉटेलच्या बंदमुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र उपवास करणाऱ्या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हॉटेल व्यवस्थापनाने उद्या आणि परवा मर्यादित स्वरूपात दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव :

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस बुकिंगसाठी पहाटेपासूनच नागरिकांची गॅस एजन्सींवर मोठी गर्दी होत असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. सरकारकडून गॅसचा साठा पुरेसा असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही ग्राहकांनी जादा दर मिळवण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरळीत नसल्याने अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Follow Us
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.