तब्बल 10 दिवस कल्याणमध्ये अघोषित लोडशेडींग, महावितरणचा अंधारमय कारभार
कल्याण पूर्वेतील नागरिक गेल्या दहा दिवसांपासून अघोषित लोडशेडिंगमुळे त्रस्त आहेत. पडघा-पाल येथील वीजवाहिनीतील बिघाडामुळे पर्यायी वाहिनीवर ताण पडत असल्याने लोडशेडिंग करावे लागत आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून कल्याण पूर्वेतील नागरिक अघोषित लोडशेडिंगमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. पडघा-पाल येथील मुख्य वीज वाहिनीतील बिघाडामुळे पर्यायी वाहिनीवर ताण येत असल्याने नाईलाजास्तव लोडशेडिंग करावे लागत असल्याची कबुली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नियमित वीज बिल भरणा करूनही नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने आज महावितरणला जाब विचारत निवेदन दिले.
कल्याण पूर्वेत टप्प्याटप्प्याने भारनियमन
कल्याण पूर्व, अंबरनाथ आणि बदलापूर परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिनीमध्ये पडघा-पाल येथे बिघाड झाला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सातत्याने वाहिन्यांमध्ये स्पार्किंग होत असल्याने दुरुस्तीला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे पर्यायी वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, मागणी वाढताच या पर्यायी वाहिनीवर ताण येत आहे. संपूर्ण वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी कल्याण पूर्वेत टप्प्याटप्प्याने भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
नागरिक हैराण
कल्याण पूर्वेत दिवसातून दोन ते तीन वेळा, कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा किंवा रात्री कधीही वीज गेल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. या त्रासातून सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज महावितरण कार्यालयात धाव घेतली.
नागरिकांचा हा अंधारमय प्रवास सुरूच राहणार का?
यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. ठाकरे गटाचे विभागप्रमुख किरण निचळ यांनी नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्यानेच वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होत असून, महावितरण नागरिकांना वेठीस धरत आहे असा आरोप केला. जोपर्यंत हा बिघाड पूर्णपणे दुरुस्त होत नाही आणि वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत कल्याण पूर्वेतील नागरिकांचा हा अंधारमय प्रवास सुरूच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
