परतीचा पाऊस पुन्हा परतला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर अचानक पावसाने पुन्हा राज्यात हजेरी लावली (Maharashtra Rain). राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. मुंबई शहरासह उपनगरांतही जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच, पालघर, नाशिक, जळगाव, मनमाड, बुलडाणा इत्यादी शहरांतही पाऊस झाला

परतीचा पाऊस पुन्हा परतला, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी (1 नोव्हेंबर) पावसाने अचानक पुन्हा राज्यात हजेरी लावली (Maharashtra Rain). राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या. मुंबई शहरासह उपनगरांतही जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच, पालघर, नाशिक, जळगाव, मनमाड, बुलडाणा इत्यादी शहरांतही पाऊस झाला (Maharashtra Rain). भर उन्हात अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. तर या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात आलेली पीकं पावसामुळे उध्वस्त झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा हवालदील झाला आहे.

मुंबईत शुक्रवारी (1 नोव्हेंबर) सायंकाळी चारच्या सुमारास दादर, परळपासून पुढे कुलाब्यापर्यंत अचानक आभाळ भरून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवली होती. तसेच, ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यातही ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याआधी पडलेल्या परतीच्या पावसानंतर आता पुन्हा अवेळी हा पाऊस परतला आहे. हवामान खात्याने हा पाऊस आणखी काही दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पालघरमध्ये सायंकाळी सात वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. अवेळी आलेल्या या परतीच्या पावसामुळे भात कापून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर, बोइसर, मनोर, केवे सफाळे परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताच्या पिकाची कापणी केली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे ते भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

येवला शहरासह परिसरातही मुसळधार पाऊस झाला. तर मनमाडमध्येही रात्रभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रेल्वे बंधारा आणि वागदरडी धरण ओवर फ्लो होऊन वाहू लागले. पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगूळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. तर अनेक घरांमध्ये हे पुराचे पाणी शिरलं. पावसामुळे शिवाजी नगर, हुडको या भागांचा शहराशी संपर्क तुटला.

जळगावातही शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. चाळीसगाव पाचोरा, भडगाव परिसरात गेल्या 16 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या बे-मोसमी पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं असून शेतीपिकांची मोठी हानी झाली आहे. तेसच, फळबागाही पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पाऊस झाला. पावसाने 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हजेरी लावल्य़ाने नागरिक हैराण झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. चांदवड, दिंडोरी, भागात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे नाशिकमधील द्राक्षांच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *