79 वर्षांची इमारत, जुने लाकडी खांब अन् गळके छत…; भंडाऱ्यात मुलांचं भवितव्य अंधारात
साकोली येथील ७९ वर्षांपूर्वी बांधलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलची इमारत धोक्यात आहे. जीर्ण इमारतीत विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. छत कोसळण्याचा धोका असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कूलची इमारत सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. या धोकादायक इमारतीत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत, हे विदारक वास्तव आता समोर आले आहे. ७९ वर्षांची ही जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते, असा गंभीर धोका असतानाही प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण आहे.
जिवावर बेतणारी दुर्घटना
साकोलीतील या शाळेची स्थापना १ जुलै १९५७ रोजी झाली होती. आज या इमारतीला ७९ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि तिची अवस्था अत्यंत बिकट आहे. शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील छत पूर्णपणे वाकलेलं असून, ते जुनाट लाकडी खांबांच्या आधारावर जेमतेम उभं आहे. इमारतीची कौले फुटल्यामुळे पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये अक्षरशः पाणी गळतं. हे पाणी विद्यार्थ्यांच्या पुस्तकांवर आणि दप्तरांवर पडतं, ज्यामुळे त्यांचा अभ्यासही नीट होत नाही. अशा धोकादायक परिस्थितीतच चिमुकली मुलं शिक्षण घेत आहेत. सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं छत कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याकडे अजूनही दुर्लक्ष केल्यास कोणतीही मोठी, जिवावर बेतणारी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक नागरिक आणि पालक व्यक्त करत आहेत.
दोन सत्रांमध्ये शाळा भरवली जाते
दररोज सकाळी मुलांना शाळेत पाठवताना पालकांच्या मनात धडकी भरते, कारण आपली मुलं सुरक्षित घरी परत येतील की नाही, याची शाश्वती त्यांना वाटत नाही. शाळेची ही धोकादायक स्थिती मुख्याध्यापकांनाही चांगलीच माहिती आहे. पण मर्यादित संसाधनांमुळे आणि वरिष्ठ स्तरावरून योग्य तो निधी उपलब्ध न झाल्याने त्यांना नाईलाजाने विद्यार्थ्यांना याच धोकादायक इमारतीत शिकवावं लागतंय. मुख्याध्यापकांनी पंचायत समितीकडून तात्पुरत्या स्वरूपात दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्याची परवानगी घेतली आहे. सकाळी एक गट आणि दुपारी दुसरा गट अशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातंय, जे अत्यंत गैरसोयीचं आहे. पण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असताना, याकडे एवढं दुर्लक्ष का केलं जातंय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
कोट्यवधींचा निधी नेमका कधी वापरणार?
एकीकडे नामांकित आणि पुरस्कारप्राप्त असलेली ही शाळा आज मुलांना जीवघेण्या परिस्थितीत शिक्षण देण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये भरवण्याची वेळ यावी हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे शिक्षण प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षामुळे आणि असंवेदनशीलतेमुळेच झाल्याचं स्पष्ट दिसतंय. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुरक्षिततेच्या अधिकाराची इथे पायमल्ली होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी, साकोली आणि लाखांदूर या तीन पंचायत समित्यांमधील १३४ वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी तब्बल १७ कोटी ५२ लाख रुपये यापूर्वीच मंजूर झाले आहेत. असे असतानाही, नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम अद्याप सुरू झालेलं नाही. मग हा मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी नेमका कधी वापरणार? शासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहतंय का? असा संतप्त आणि गंभीर सवाल आता नागरिक आणि पालक विचारत आहेत. मंजूर निधी असतानाही बांधकाम सुरू न होणं हे प्रशासकीय दिरंगाईचा कळस असून, याला जबाबदार कोण, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
