फडणवीस तुम्हाला गर्व झाला असेल पण.., मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य
आज पनवेलमध्ये बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

पनवेल तालुक्यातील खांदाकोलनी येथे ‘सकल मराठा समाज मंडळा’तर्फे उभारण्यात आलेल्या मराठा भवनाचे लोकार्पण आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
एक जण आला तो म्हणत होता याला गोळ्याच चारा, त्यांनी माझा घातपात करायचा प्रयत्न केला. मग मी त्याच्या पूर्ण सिस्टीमचा कोथळाच बाहेर काढला. गरिबांसाठी मी लढतो, तर तुम्ही मला मारायचा प्रयत्न करता? नार्को टेस्ट साठी मी स्वतःच अर्ज केला आहे. मी 96 कुळी मराठा आहे, मी कोणाला घाबरत नाही. जे तीन आरोपी आहेत, त्यांनी कबुल केलं आहे की, जरांगे पाटलांची सुपारी धनंजय मुंडे यांनी आम्हाला 2.50 कोटी रुपयांना दिली होती. तुम्हाला अजून काय पुरावे पाहिजे? असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. फडणवीस तुम्हाला गर्व झाला असेल, पण तुमची सत्ता कायम नाही. मी या समाजाला मायबाप मानले आहे. माझ्या अंगात काहीच राहिले नाही, फक्त हाडके राहिली आहेत. मी आता फक्त या समाजासाठी दिवसरात्र फिरत आहे. आपल्याला बढती मिळत नाही, त्याचे मूळ कारण आहे आरक्षण, मला हजारो करोडो दिले असते या सरकारने. मला चौथी नापास म्हणतं हे सरकार, पण या चौथी नापास माणसाने यांना झुकवलं की नाही? असा सवाल यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलं की, मला तुमचा एक रुपया नको फक्त हाक दिली तर रस्तावर या. मालेगावमध्ये भयानक हत्याकांड झाले, त्या कुटुंबाचे लेकरू जाऊन देखील त्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ आली. गिरीश महाजन यांचे माझे पटत नाही तरी मी त्यांना फोन लावला. 4 मागण्या पैकी या कुटुंबाच्या 3 मागण्या तातडीने मंजूर झाल्या आहेत, असं मनोजल जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
