केडीएमसी निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना आणखी एक धक्का, मनसेकडून पुरावा सादर, म्हणाला…
महाराष्ट्रातील संशयास्पद बिनविरोधी निवडींविरोधात अविनाश जाधव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, निवडणूक आयोग दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या बिनविरोधी निवडणुकांच्या प्रक्रियेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची थट्टा सुरू आहे. आधी मतदार विकत घेतले जायचे, पण आता थेट उमेदवारच विकत घेतले जात आहेत, अशा शब्दांत मनसे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी आणि निवडणूक यंत्रणेवर घणाघाती हल्ला चढवला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात ज्या पद्धतीने बिनविरोधी निवडणुकांचे सत्र सुरू आहे, त्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि दबावाचे राजकारण असल्याचा दावा करत अविनाश जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
नेमके प्रकरण काय?
गेल्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात ज्या काही बिनविरोधी निवडी झाल्या आहेत, त्या संशयास्पद आहेत. निवडणूक प्रक्रियेत सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. जोपर्यंत या बिनविरोधी निवडींची पूर्ण पारदर्शक चौकशी होत नाही, तोपर्यंत संबंधित निकाल राखून ठेवले पाहिजेत. ही चौकशी केवळ प्रशासकीय पातळीवर न होता, ती निवृत्त न्यायाधीशांमार्फत किंवा थेट न्यायालयीन देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.
निवडणूक अधिकारी अपक्ष उमेदवारांच्या अर्जांबाबत तातडीने निर्णय घेतात. मात्र अधिकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते. नियमानुसार अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला हरकती घेण्याची संधी मिळते. मात्र, अनेक ठिकाणी Nil फॉर्म लावलेच गेले नाहीत. विचारणा केली असता विसरलो अशी उडवाउडवीची उत्तरे सरकारी यंत्रणेकडून दिली जात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत प्रचंड पैशांचा वापर झाला असून राजश्री नाईक या आमच्या सहकाऱ्याला आलेला फोन हा याचा मोठा पुरावा असल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केला आहे.
शेवटचा मार्ग म्हणून न्यायालयाकडे दाद मागितली
जर उमेदवार नसेल तरी नोटा (NOTA) हा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे थेट बिनविरोधी निवड जाहीर करण्याऐवजी निवडणूक व्हायला हवी. जर प्रक्रियाच पार पडणार नसेल, तर लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही. ही राजेशाही आणण्याची तयारी सुरू आहे. जर लोकशाहीची हत्याच करायची असेल तर आम्हाला निवडणुका नकोत, आम्ही माघार घेतो. पण आज आवाज उठवला नाही तर महाराष्ट्र बदनाम होईल. न्याय मिळेल की नाही हे कोर्टाच्या हातात आहे, पण आम्ही शेवटचा मार्ग म्हणून न्यायालयाकडे दाद मागितली आहे, असेही अविनाश जाधव म्हणाले.
या प्रकरणी कायदेतज्ज्ञ असीम सरोदे हे अविनाश जाधव यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे यापूर्वीचे काही महत्त्वाचे निकाल संदर्भासाठी न्यायालयासमोर ठेवण्यात आले आहेत. “जर अशाच प्रकारे लोकशाहीची हत्या होणार असेल, तर आम्ही निवडणुकांतून माघार घेण्यास तयार आहोत, पण ही विकृती चालू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
