आतली बातमी, एकनाथ शिंदेंच्या सत्काराला ठाकरे गटाचा एक खासदार होता उपस्थित
दिल्लीत शरद पवार यांच्याहस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापलं आहे. नेहमी शरद पवारांची स्तुती करणारे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. आता एकनाथ शिंदेंच्या सत्काराला ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी दिल्लीत शरद पवार यांच्याहस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार ही गोष्ट ठाकरे गटाच्या खूपच जिव्हारी लागली. खासदार संजय राऊत यांनी यावरुन शरद पवारांवर हल्लाबोल केला. “तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब असं संजय राऊत म्हणाले” “हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही, तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे” अशी घणाघाती टीका राऊतांनी केली होती.
आता शिंदेंच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. “सर्वपक्षीय नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, म्हणून मी तिथे गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम असल्याने तिथे गेलो होतो” असं संजय दीना पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
‘तुम करे तो चमत्कार… हम करे तो बलात्कार ?’
संजय राऊत यांच्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी संजय राऊतांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. ‘तुम करे तो रासलिला… हम करे तो कॅरेक्टर ढिला ? तुम करे तो चमत्कार… हम करे तो बलात्कार ? दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही.’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं. संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली. त्याला हे प्रत्युत्तर आहे.
‘जे बोलले ते बरोबर बोलले’
“शरद पवार साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केला आहे, म्हणून राऊत साहेब जे बोलले ते बरोबर बोलले. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता, पण विश्वासघात झाला, असं राऊत साहेबांनी म्हटलं आहे” असं विनायक राऊत म्हणाले.