तर मुंबईचा महापौर भविष्यात मराठी कसा होईल, मनसे नेत्याचा रोखठोक सवाल
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप मुंबईतून मराठी चेहरा पुसून टाकण्याचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट रचत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते अविनाश जाधव यांनी भाजपच्या उमेदवारी यादीवर आणि त्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. भाजप मुंबईतून मराठी चेहरा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा मोठा कट आहे, असा खळबळजनक आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.
अविनाश जाधव यांनी भाजपच्या ६६ उमेदवारांच्या यादीचे विश्लेषण करत म्हटले की, “भाजपने जाहीर केलेल्या ६६ उमेदवारांपैकी तब्बल २० उमेदवार हे उत्तर भारतीय आहेत. जर मुंबईसारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांना तिकीट दिले जाणार असेल, तर मुंबईचा महापौर भविष्यात मराठी कसा होईल? हा केवळ निवडणुकांचा प्रश्न नसून मुंबईच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.
ठाकरे नावाचा ब्रँड आजही तितकाच प्रभावी
भाजपचे मनसुबे ओळखून आता ठाकरे बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज आहे. जर आपण विभागले गेलो, तर हे लोक मुंबई आपल्या हातातून हिरावून घेतील. महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकारणात ठाकरे नावाचा ब्रँड आजही तितकाच प्रभावी आहे आणि तोच या संकटातून मराठी माणसाला वाचवू शकतो, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. तसेच केवळ भाजपच नाही तर एकनाथ शिंदे गटावरही त्यांनी निशाणा साधला.
“उत्तर भारतीय आणि परप्रांतीय लोकांना उमेदवारी देण्याचा सपाटा शिंदे गटानेही लावला आहे. मुंबई तोडण्याचा हा एक पद्धतशीर घाट घातला जात आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे की, आजही मुंबईत ४० टक्के मराठी माणूस खंबीरपणे उभा आहे. हा मराठी माणूस भारतीय जनता पार्टीला त्यांची खरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
मनसे आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार
धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांनाच मिळायला हवे आणि भारतीय न्यायव्यवस्था त्यांना नक्कीच न्याय देईल. पराग शहा यांच्यासारखे नेते जेव्हा मारहाण करतात, तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, यावरून सत्ताधारी पक्षाचा उद्दामपणा दिसून येतो. जोपर्यंत राज ठाकरे मुंबईत आहेत, तोपर्यंत मराठी माणसाच्या केसालाही धक्का लागणार नाही. मराठी माणूस फक्त राजसाहेबांच्या नेतृत्वाखालीच सुरक्षित आहे, असा ठाम विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. तसेच मनसे आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असून, उमेदवार अर्ज भरताना मोठे शक्तीप्रदर्शन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
