आम्ही सारे सावरकर… शिंदे ते फडणवीस सर्वांनीच डीपी बदलले; राहुल गांधी नव्हे ‘या’ नेत्याला घेरण्याची तयारी?
विनायक दामोदर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. शिंदे गटाने सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ही यात्रा निघणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्यावर जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी होण्यापासून रोखली गेली आहे. असं असलं तरी शिवसेना आणि भाजप मात्र हा मुद्दा तापवण्याच्या तयारीत आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शिवसेना आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटर आणि फेसबुकचे डीपी बदलले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तर सावरकर यात्रा सुरू करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.
येत्या 30 मार्चपासून राज्यात सावरकर गौरव यात्रा सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. विरोधकांना घेरण्यासाठी अत्यंत आक्रमक मोहीत हाती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट आपल्या ट्विटर हँडलवरील प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यांनी आपल्या प्रोफाईलवर विनायक दामोदर सावरकरांचा फोटो लावला आहे. त्यावर आम्ही सारे सावरकर असं लिहिलं आहे.

cm eknath shinde
फडणवीस यांनीही प्रोफाईल बदलली
मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरचा प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यावर मी सावरकर असं लिहिलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रभरातील शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी आपले प्रोफाईल पिक्चर बदलले आहेत. त्यावर सावरकरांचा फोटो ठेवलेला आहे. या फोटोवर मी सावरकर किंवा आम्ही सारे सावरकर असं लिहलं आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेने विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते राहुल गांधी हा बहाणा आहे. भाजपला आणि शिवसेनेला या मुद्द्यावरून ठाकरे गटाची कोंडी करायची आहे. ठाकरे गट सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसपुढे लोटांगण घालत आहे. ठाकरे गटाने हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्वावर आम्हीच आक्रमक आहोत, असं भाजप आणि शिवसेनेला दाखवायचं आहे.

devendra fadnavis
भाजपचा सावरकरांशी संबंध काय?
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला सावरकरांच्या मुद्द्यावरून सुनावलं आहे. भाजपचा सावरकरांशी काय संबंध? संघ तर सावरकरांना आपला दुश्मन मानत होती. संघाने कधीच सावरकरांना चांगली वागणूक दिली नाही. सावरकरांना केवळ बाळासाहेब ठाकरे आदर्श मानायचे. भाजपचं सावरकर प्रेम ढोंग आहे. आणि गद्दारांच्या तोंडून सावरकरांचं नाव शोभा देत नाही. शिंदे गटाला सावरकर गौरव यात्रा सुरू करण्याचा काहीच अधिकरा नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.
