बोगस फिटनेस सर्टिफिकेट बनवून ‘एलआयसी’ला चुना लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

बोगस फिटनेस सर्टिफिकेट बनवून 'एलआयसी'ला चुना लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : जीवन विमा पॉलिसी घेण्यासाठी बोगस फिटनेस सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने भांडाफोड केला आहे. मुंबईच्या सांताक्रूझ भागात दत्तात्रेय नर्सिंग होमच्या माध्यमातून हे रॅकेट चालत होते. या प्रकरणी गुन्हे शाखेने डॉ. राकेश दुग्गलसह दोघांना अटक केली आहे.

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ही कंपनी लोकांना जीवन विमा विकते. या विमा कंपनीच्या ग्राहकांना डॉ. राकेश दुग्गल हे बोगस फिटनेस सर्टिफिकेट बनवून देत होते. एलआयसी कंपनीच्या नियमांनुसार फिटनेस सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे आहे. ग्राहकांना जीवन विमा घेण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य असतं. त्यामुळे या बोगस फिटसेन सर्टिफिकेटच्या माध्यामातून डॉ. राकेश दुग्गल एलआयसी कंपनीला चुना लावायचे काम करत होते.

डॉ. राकेश दुग्गल हे मुंबईच्या सांताक्रूझ पूर्व येथे दत्तात्रेय नर्सिंग होम चालवतात. या नर्सिंग होमच्या माध्यमातून अयेग्य लोकांना बोगस फिटनेस सर्टिफिकेट बनवण्याचं रॅकेट सुरु असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली, यानंतर पथकाने या नर्सिंग होमवर धाड टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पथकाने नर्सिंग होममधून मोठ्या प्रमाणावर बोगस फिटनेस सर्टिफिकेट जप्त केले. डॉ. राकेश दुग्गल आणि त्याच्या सोबत काम करणाऱ्या एकाला पथकाने ताब्यात घेतलं असून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणाची माहिती गुन्हे शाखेने एलआयसी कंपनीलाही कळवली आहे. सध्या पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. आजवर किती लोकांनी असे बोगस फिटनेस सर्टिफिकेट दाखवत जीवन विमा मिळवला आहे, याचाही तपास सुरु आहे. तर स्थानिक कोर्टाने या दोन्ही आरोपींना 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI