उद्धव ठाकरे म्हणजे ‘ मॅटिनी मुख्यमंत्री’, वर्षभर मंत्रालयात पाय ठेवला नाही; भाजपची खोचक टीका

अलीकडे कुवत नसणारी लोकं पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलायला लागली आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींमुळेच पाच वर्षे सत्ता उपभोगली. | CM Uddhav Thackeray BJP

उद्धव ठाकरे म्हणजे ‘ मॅटिनी मुख्यमंत्री', वर्षभर मंत्रालयात पाय ठेवला नाही; भाजपची खोचक टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभर मंत्रालयात पाय ठेवलेला नाही. त्यांना हल्ली लोक गमतीने मॅटिनी मुख्यमंत्री म्हणतात, अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली. त्यांनी यासंदर्भात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये विक्रांत पाटील यांनी शिवसेनेचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी मध्यंतरी लिहलेल्या एका ब्लॉगच्या अनुषंगाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या पत्रामुळे आता युवासेना विरुद्ध भाजप युवा मोर्चा असा वाद रंगण्याची शक्यता आहे. (BJP leader Vikrant Patil take a dig at CM Uddhav Thackeray)

अलीकडे कुवत नसणारी लोकं पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोलायला लागली आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींमुळेच पाच वर्षे सत्ता उपभोगली. 18 महिन्याच्या काळात मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क किती ? याउलट देवेंद्रजींच्या काळात संपवले. व्हीआयपी कल्चर पुन्हा सुरू केल्याबद्दल तुमच आणि मुख्यमंत्र्यांच कौतुकच, असा टोला विक्रांत पाटील यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात मंत्रालयात पाय ठेवलेल नाही. त्यामुळे लोक उद्धव ठाकरेंना मॅटिनी मुख्यमंत्री म्हणतात, असेही विक्रांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी, हीच उद्धव ठाकरेंची प्राथमिकता’

उद्धव ठाकरे बोलतात त्याप्रमाणे ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी, हीच त्यांची प्राथमिकता आहे. आदित्यजी आपले बाबा मुख्यमंत्री आहेत. तसेच ‘पुण्यवान’ माणसांची तुम्हाला साथ, तुम्हाला कधीच आर्थिक चणचण भासणार नाही. पण आता तुम्ही मुंबईबाहेरील महाराष्ट्र समजून घेत युवकांची परिस्थिती सावरण्यासाठी बघा. संजय राठोड, अनिल देशमुख आणि आता तुमचे अनिल परब अडचणीत आहेत याचे तुम्हीही साक्षीदार आहात. महाविकासआघाडीत एवढे ‘ प्रताप ‘ सुरू असताना केंद्राकडे बोट दाखवून स्वतच भ्रष्ट राजकारण झाकण्याची धडपड कशासाठी, असा सवाल विक्रांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.

विक्रांत पाटील यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

आपणास खुले पत्र लिहीण्याचे कारण की, आपल्या पक्षाचे माध्यम व जनसंपर्क प्रमुख यांनी ४ जूनला लिहीलेल्या पत्राच्या अनुषंगाने शिवसेना आणि आपणांस वाटणारा पंतप्रधान ‌ मोदींबद्दलचा हेवा व ईर्ष्या स्पष्ट दिसून येते, आणि ती इतकी आहे की त्यामुळे मोदींच्या सत्तेच्या सात वर्ष काळामधील पाच वर्ष तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत सत्तेचा भाग होता आणि पंतप्रधान मोदीजींच्या नावाने आपले 18 खासदार निवडून आले हे ही विसरलात. असो, पंतप्रधान मोदींबाबत त्यानची बोलायची उंची तर नाहीच नाही पण कुवत पण नाही. तरी पण खालील मुद्द्यांवर आपले उदबोधन करू इच्छितो-

  1. स्वतला जनसंपर्क प्रमुख आणि माध्यम प्रमुख म्हणवणारे हर्षल प्रधान आपल्या पत्रात जनतेला सांगण्यास कमी पडले की मुळात मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या १८ महीण्याच्या कार्यकाळात किती जनसंपर्क केला ? त्यांच्या ‘कोकण दौऱ्याच्या’ वेगाची तुलना तर ‘ताउक्ते चक्रीवादळा’ सोबत केली जाते. तसेच जेव्हा ते स्वत: आपली आलीशान मर्सिडीज कार घेउन बाहेर निघतात, त्यावेळेस कुठलाही जनसंपर्क होऊ नये म्हणून संपूर्ण प्रशासन रस्ते जनमुक्त केले जातात आणि त्याकरिता 40-40 मिनिटे जनतेला वेठीस धरतात. मुळात देवेंद्र फडणवीस सरकारानं बंद केलेल हे ‘व्ही.आय.पी.‘ कल्चर महाराष्ट्रात पुनर्जीवित करण्यासाठी आपले व मुख्यमंत्र्यांचे कितीही कौतुकI केले तरी कमीच….

2.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा-अठरा तास काम करतात याचे कौतुक केले जाते पण ते देशापेक्षा पक्षवाढीसाठीच अधिक काम करतात असा जावईशोध त्यांच्या पत्रात करण्यात आला होता. पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती तास काम करतात? गमतीने त्यांना ‘मॅटिनी मुख्यमंत्री’ म्हटले जाते. इतकच नाही तर एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही उद्धवजींनी मंत्रालयात पायच ठेवलेला नाही. असो ‘ माझं कुटूंब माझी जबाबदारी ‘ हीच त्यांची सर्वार्थानं प्राथमिकता असावी.

3. २० हजार कोटी रुपयांचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हाती घेतल्याबद्दल मोदीजींना टार्गेट करताना हर्षल प्रधान यांनी म्हटले आहे की तेवढ्याच पैशात देशातील नागरिकांना कोरोनाची लस देता आली असती असही या पत्रात नमुद करण्यात आलय. हे केंद्र सरकार सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प देशाचा सर्वोच्च मानबिंदू आहे, त्याचे काम सुरूच राहील. केंद्राने सेंट्रल व्हिस्टापायी अन्य ठिकाणचा निधी कुठेही कमी केलेला नाही. पण मुंबईतील मनोरा आमदार निवासाची साधी विटही महाविकास आघाडी सरकारला गेल्या दीड वर्षात लावता आलेली नाही. यामुळं राहण्याची जागा नसल्याने आमदारांचे काय हाल होताहेत ते त्यांनाच विचारा. आपल्या कार्यकाळात फ़क्त केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी कंपनीचे कंत्राट रद्द केले आणि मुळ कंत्राट ६०० पासून ९०० कोटीवर नेले.

4. मोदी सरकारने खतांचे दर वाढविले यासाठी दूषणे देताना आपले ‘प्रधान’ जी वाढीव खतदराचा फटका हा सामान्य शेतकऱ्यास बसू नये यासाठी मोदी सरकारने खतांच्या खरेदीवर सबसिडी दिली आहे हे नमूद करण्यास सोईस्कर विसरलेले दिसतात. दरवाढीसाठी केंद्राला दोष देण्यापेक्षा आधी त्यांनी सिस्टम समजून घेतली असती तर बर झाल असतं.

5. पेट्रोल, डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले असल्याची इतकी चिंता राज्यातील महाविकास आघाडी सरकारला असेल तर त्यांनी या दोन गोष्टींवर असलेला ‘राज्याचा कर’ १० रूपये कमी केला तर ‘ किंबहुना’ राज्यातील जनतेला मोठा दिलासा आपणास देता येईल. असे केल्यास आपण फक्त राजकारणासाठी केन्द्रला उपदेश करत नाहीत असा विश्वास सामान्य जनतेला वाटेल.

6.  कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आलय हे वाक्य ठोकल की वाहवा मिळते अशी धारणा आघाडी सरकारमधील सगळ्यांची झाली असली तरी मोदी सरकारनं राज्यातील कोरोना रूग्णांना कोट्यवधी रूपयांची दिलेलि मदत लपवून राहू शकत नाही हे लक्षात घ्या. आपण कोविड हाताळण्याच्या श्रेयासाठी आकडेवारीची बनवाबनवी करून कशी स्वत: ची स्तुति करवून घेतली हे सांगणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र मॉडेल

महाराष्ट्रात सप्टेंबर 2020 (12,079) आणि एप्रिल 2021 (14,164) एकूण 26,243 मृत्यूंची नोंद झाली. पण महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक 26,531 मृत्यू हे एकट्या मे 2021 मध्ये झाले आहेत. मे महीण्यातील अपयश लपवण्याकरिता दर आठवड्यातून नोंदणी मधे हेरफेर करून एका आठवड्यात 5000 मृत्यू जुने अधिक करण्यात आले. मे महिन्यात देशात एकूण मृत्यू 1,19,189 झाले. त्यात महाराष्ट्रातील 26,531. (म्हणजे 23 टक्के).महाराष्ट्रातील रूग्णसंख्या कमी करण्यासाठी दुसरी पद्धत अवलंबविण्यात आली. ती म्हणजे 55 टक्के चाचण्या रॅपिड अँटीजेन पद्धतीवर शिफ्ट करण्यात आल्या. एकंदर आकड्यांची हेरफेर करून तांत्रिक निकषावर असा आभास निर्माण करण्यात आला की उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्र मॅाडेल किती यशस्वी आहे.

आता मुंबई मॉडेल पहा…

मुंबईत मे महिन्यात 1701 मृत्यू झाले असले तरी 518 मृत्यू हे ‘डेथ ड्यू टू अदर रिझन’ या वर्गवारीत टाकले आहेत.एप्रिल महिन्यात 666 आणि मे मधील 518 असे या दुसर्‍या लाटेतील 2 महिन्यात एकूण 1184 मुंबईतील मृत्यू हे या अन्य वर्गवारीत टाकण्यात आले. राज्यात या दोन महिन्यात 1447 मृत्यू या वर्गवारीत होते. त्यात मुंबईतील 1184 मृत्यू आहेत. म्हणजे हे प्रमाण 82 टक्के इतके आहे.
मुंबईत एप्रिल 2021 या महिन्यात 12,94,067 चाचण्या करण्यात आल्या, मे 2021 मध्ये त्या 8,10,138 इतक्या आहेत. म्हणजे 4,83,929 चाचण्या कमी झालेल्या आहेत. जर चाचण्या 30-35 टक्क्यांनी आधीच्या महिन्यापेक्षा कमी केल्या तर आपोआप रूग्णसंख्या कमी होणार. तर असे आहे मुंबई मॉडेल.

7.  मा. आदित्यजी आपले बाबा हे मुख्यमंत्री आहेत हे आपलं मोठ सौभाग्य आहे आणि आपल्याला ‘पुण्यवान’ माणसाची पण साथ लाभलेली आहे. त्यामुळे आपले सरकारमधील सर्व कार्यभाग त्यांच्या माध्यमातून लगेचच मार्गी लागतात. यामुळ आपल्याला कोणताही आर्थिक चटका आपनस सहन करावा लागत नाही. पण करोना आणि लॉक्डाउनी महाराष्ट्रातील युवा वर्गांची परिस्थिती अतिशय बिकट असून अनेकांचा रोजगार बुडालाय. संपुर्ण राज्यातली परिस्थिती पाहता सर्व युवा वर्गाची आर्थिक, शैक्षणिक आणि समाजिक कोंडी झाल्यानं अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे कि आपण केंद्रावरती अभ्यास न करता मुंबईबाहेरील महाराष्ट्रातील परिस्थिती समजून घ्यावीत.

आपल्या कार्यकाळात संजय राठोड यांना एका तरुण मुलीच्या आत्महत्येप्रकरणी घरी जावे लागले, अनिल देशमुख यांना शंभर कोटी खंडणीच्या आरोपात राजीनामा द्यावा लागला, अनिल परब हे आरोपांच्या घेऱ्यामध्ये अडकले आहेत. आणखीन एक दोन मंत्री चौकशीच्या रडारवर येऊ शकतात. आपल्याला तर याचा बोध असेलच कारण आपण यासगळ्याचे साक्षी आहात .

तर मग असे सगळे महाविकास आघाडीचे प्रताप सुरु असताना केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वतःचे भ्रष्ट राजकारण झाकण्याची धडपड कशासाठी ?

 

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं: प्रविण दरेकर

(BJP leader Vikrant Patil take a dig at CM Uddhav Thackeray)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI