अनिल कपूरने वाढवल्या देवेंद्र फडणवीसांच्या समस्या; कारण काय?
अभिनेता अनिल कपूरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समस्या वाढवल्या आहेत. खुद्द फडणवीस याविषयी एका कार्यक्रमात बोलले. अभिनेता अक्षय कुमारने त्यांची ही मुलाखत घेतली. ते असं का म्हणाले, सविस्तर जाणून घ्या..

‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या (FICCI) कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न होता, “राजकारणातील तुम्ही स्टार आहात. तुम्ही कधी कोणत्या चित्रपटाने किंवा व्यक्तीने प्रभावित झाला आहात का?” या प्रश्नावर फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिलं. हे उत्तर देताना त्यांनी अनिल कपूर यांच्या ‘नायक’ या चित्रपटाचा उल्लेख केला. इतकंच नव्हे तर ‘नायक’ने माझ्या समस्याही वाढवल्या आहेत, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
“चित्रपट हे फक्त नेतृत्व गुणालाच नाही तर मानवी भावनांनाही प्रभावित करतात. मी आजवर अनेक चित्रपटांमुळे प्रभावित झालो. राजकारणाविषयी बोलायचं झाल्यास, मी एका चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करू इच्छितो. त्या चित्रपटाने मला प्रभावित तर केलंच, परंतु त्यासोबत माझ्या समस्याही वाढवल्या आहेत. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘नायक’. नायक या चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांनी एका दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभरात इतकी कामं केली. ते पाहून मी कुठेही गेलो तरी लोक म्हणतात, नायकसारखं काम करा. एका दिवसात ‘नायक’मध्ये अनिल कपूर किती कामं करतात, ते पहा. त्या चित्रपटाने जणू एक बेंचमार्कच तयार केलाय,” असं ते म्हणाले.
“एका दिवसासाठी दिग्दर्शक बनलात, तर कोणता सीन पहिला शूट करणार?”
“जर तुम्ही एका दिवसासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक बनलात आणि त्या चित्रपटाचं नाव ‘महाराष्ट्र’ असेल, तर पहिला सीन तुम्ही कोणता चित्रित कराल”, असा प्रश्न अक्षयने पुढे विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रावर चित्रपट बनत असेल तर त्यातील पहिला सीन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा असेल. ते राज्याभिषेकासाठी बसलेले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचं निर्माण.. हाच तो सीन असेल.” त्यानंतर अक्षयने त्यांना राजकारणातील खरे हिरो कोण वाटतात, असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असं उत्तर देत त्यामागील कारणसुद्धा सविस्तर सांगितलं.
