पवारांच्या आशीर्वादानेच मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष, आता पवार विरुद्ध पवार… हे तर कालचक्र; फडणवीस यांचा टोला
फोडाफोडी करायचा दुसरा राऊंड नाही. अनेक लोक आमच्या संपर्कात येतात. सोबत यायला तयार असता. एखादा मोठा माणूस येत असेल तर कसं घेणार नाही? म्हणूनच अशा व्यक्तीला आम्ही सोबत घेतो. पण माझं एकच उत्तर असतं आगे आगे देखो होता है क्या, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई | 1 मार्च 2024 : अजित पवार यांना सोबत घेऊन आपण कोणताही बदला घेतला नाही. कोणताही सूड उगवला नाही. आमचं तसं राजकारण नाही. आम्ही फक्त संधीचा फायदा झाला, असं सांगतानाच शरद पवार यांच्या आशीर्वादानेच या महाराष्ट्रात मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहायला मिळाला. इतरही अनेक घराण्यात असेच संघर्ष पाहायला मिळाले. आता जर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष होत असेल तर याला कालचक्रच म्हणता येईल, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
टीव्ही 9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राजकारणात असं होतं. पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला. अनेक घराण्यात संघर्ष पाहावे लागले. पवारांनी अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले. हे कालचक्र आहे. काहीच नाही दुसरं. कालचक्र आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पवार पर्व वगैरे नाही
शरद पवार यांचं पर्व वगैरे होतं असं काही मानत नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी एक काळ गाजवला आहे. आजही ते संघर्ष करत आहेत. आज लोकांना देशात एकच नेतृत्व मोठं वाटतं. आश्वासक वाटतं. ते म्हणजे मोदींचं. मोदींवर लोकांचा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हे कालचक्र आहे
अजितदादांना सोबत घेऊन तुम्ही बदला घेतलाय का? असा सवाल करण्यात आला. त्यालाही फडणवीस यांनी उत्तर दिलं. मी स्वत:ला चाणक्य समजत नाही. शरद पवार चाणक्य असतील. मी नाही. कोणी जर धोका दिला, विश्वासघात केला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे हे मी राजकारणातच शिकलो आहे. राजकारणात अपमान होत असतात. अपमान सहन करता येतात. विश्वासघात सहन करायचा नसतो. पण म्हणून मी बदला घेतला असं म्हणणार नाही. संधी मिळाली तर फायदा घेतला पाहिजे. तोच फायदा मी घेतलाय, असं सांगतानाच हा पोएटीक जस्टीस आहे. हे कालचक्र आहे. कराल तसं भरावं लागतं. मी ईश्वरावर भरोसा ठेवणारा आहे. विश्वासघात होतो तेव्हा कालचक्र उत्तर देतं. मी उत्तर दिलं नाही. कालचक्राने दिलं, असंही त्यांनी सांगितलं.