घाटकोपर दुर्घटनेचा धसका, मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय, माहिती अधिकारातून काय झाले उघड…
13 मे रोजी मुंबईत वादळी पाऊस झाला होता. त्या वेळी धुळीच्या वादळाने घाटकोपर येथे पेट्रोल पंपाववर महाकाय लोखंडी होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 74 जण जखमी झाले होते.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने देखील दखल घेतली होती. आता या दुर्घटनेतून धडा घेत मध्य रेल्वे प्रशासनाने पावले उचलली आहे. मध्य रेल्वेने आपल्या रेल्वेच्या रुळांच्या जवळील चार महाकाय होर्डिंग हटविण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर 14 होर्डिंगचा आकार कमी केला आहे. या संदर्भात माहीतीच्या अधिकारातून माहिती मिळाली असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे.तर पश्चिम रेल्वेने मात्र या संदर्भातील माहिती दिलेली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने 4 महाकाय होर्डिंग हटविले आहेत. तर 14 होर्डिंगचा आकार कमी केली असल्याचे माहितीच्या अधिकारात कळविले असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. तर पश्चिम रेल्वेने मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत अधिक काही कळविले नसल्याचे म्हटले आहे.
गलगली यांनी मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांनी या संदर्भातील कारवाईची माहिती दिली आहे. या यादीत 18 पैकी 4 होर्डिंग कायमस्वरूपी हटविले आहेत. यात सँडहर्स्ट रोड ( 3200 फूट), चुनाभट्टी ( 3200 फूट ), टिळक नगर येथील 2 ठिकाणचे ( 1598 फूट ) या होर्डिंगचा समावेश आहेत. मेसर्स रोशन स्पेस यांची 2 तर मेसर्स पायोनियर आणि मेसर्स अलख यांची प्रत्येकी 1 होर्डिंग आहेत.
आकार कमी केलेले होर्डिंग
ज्या होर्डिंगचा आकार कमी केला त्यात वाडी बंदर, भायखळा येथील- 3, चुनाभट्टी येथील – 5, सुमन नगर येथील -3 आणि टिळकनगर येथील -2 अशा होर्डींगचा समावेश आहे. 14 होर्डिंगचा आकार कमी केला आहेत त्यात 7 देवांगी आऊटडोअर, 2 मेसर्स रोशन स्पेस, 2 मेसर्स झेस्ट एंटरप्राइज, मेसर्स वॉललोप, मेसर्स कोठारी आणि मेसर्स नुकलेसईट्स यांची प्रत्येकी 1 होर्डिंग आहेत.
पश्चिम रेल्वे संभ्रमात
मध्य रेल्वेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईची माहिती दिली. परंतू पश्चिम रेल्वेचे जन माहिती अधिकारी सौरभ कुमार यांनी ही माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत होर्डींगवरील कारवाईची माहिती दिलेली नसल्याचे माहीती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे.घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने उचललेल्या पावलांवर गलगली यांनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे भविष्यात घाटकोपर सारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.