पाऊस LIVE : मुंबईसह उपनगरात मुसळधार, जनजीवन विस्कळीत

मागील 3 आठवड्यापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावली. रात्री हिंदमाता परिसरात आणि सकाळपासून किंग सर्कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे.

पाऊस LIVE : मुंबईसह उपनगरात मुसळधार, जनजीवन विस्कळीत


मुंबई : मुंबईत मागील 3 आठवड्यापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून जोरदार हजेरी लावली. हिंदमाता परिसरात रात्री आणि किंग सर्कल भागात सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली. साचलेल्या पाण्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला. ऐन ऑफिसच्या वेळेत रस्त्यांवर पाणी साचल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. दक्षिण मुंबईला पावासाने झोडपलं असताना, उपनगरातही धुवाँधार पाऊस झाला.

अंधेरी, वांद्रे, दादरमध्येही पावसाचा जोर

अंधेरी, वांद्रे, दादर या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी  भरल्याने पायी जाणाऱ्यांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचेही हाल होत आहेत. सायन ते सीएसएमटी दरम्यान ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. त्यामुळे काही प्रमाणात रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. मध्य रेल्वेवर लोकल उशिराने धावत आहेत.

वसई-विरार-नालासोपाऱ्यात पाणी साचलं

वसई-विरार-नालासोपारा परिसरातही रिमझिम पाऊस सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून पावसाने जोरदार आगमन केलं होतं. रात्रभर पावसाने वसई-विरारला झोडपलं. मात्र, सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यानंतर अजूनही पाऊस सुरुच आहे. त्यामुळे वसई-विरार-नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. या पावसात नागरिकांना चालण्यातही अडथळा येत आहे. पावसाचा जोर पाहता या भागातील शाळांनी दुपारनंतर सुट्टी जाहीर केली आहे.

कल्याण-डोंबिवलीतही पावसाची जोरदार बॅटिंग

कल्याण-डोंबिवलीमध्येही मंगळवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काहीकाळ संततधार सुरु होती. मात्र, बुधवारी सकाळी या पावसाने पुन्हा जोर धरला. पावसामुळे सर्वत्र थंड वातावरण पसरले आहे. परंतू सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले. या संततधार पावसामुळे कल्याणमधील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणच्या अहिल्याबाई चौक, मोहम्मद अली चौक, शिवाजी चौक, कल्याण पूर्वेतील राजाराम पाटील नगर अशा अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कल्याण ग्रामीण मधील अडवली ढोकली या परिसरात तर रस्त्यांना तलावाचं स्वरुप आलं आहे.

ठाण्यातही मुसळधार

ठाण्यात मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून पावसने जोरदार हजेरी लावली. रात्रभर बरसल्यानंतर सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली खरी, मात्र काही वेळाने पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यातही जागोजागी पाणी साचलेलं पाहायला मिळालं. त्याशिवाय रेल्वे सेवेवरही या मुसळधार पावसाचा परिणाम पाहायला मिळाला. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने होत आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI