Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गटाचा शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का, या प्रसंगी उद्धव म्हणाले की…
Uddhav Thackeray : आज उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला . मुंबई महापालिका निवडणुकीआधी राजकारणात अशी बरीच उलथापालथ पहायला मिळू शकते. यावेळी उद्धव यांनी डोळे उघडे ठेऊन सगळीकडे बघा. भाजप कपट, कारस्थान करणारा पक्ष आहे असा आरोप केला.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, त्याआधी आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिला. मागाठाणेमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. हा शिंदे आणि प्रकाश सुर्वे यांच्यासाठी धक्का आहे. कारण प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेना शिंदे गटात आहेत. “भाजपा आणि गद्दार किती ढोंगी आहेत हे आता लक्षात यायला लागलय. ही लढाई सोपी नाही. तुम्ही एका जोशात आहात. जोशात असलं पाहिजे. पण डोळे उघडे ठेऊन सगळीकडे बघा. भाजप कपट, कारस्थान करणारा पक्ष आहे” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
“पक्ष फोडले तशी आता घर फोडायला बघतायत. त्यांचा हिंदुत्वाचा फुगा फुटला आहे. पालघरमध्ये आपण सत्तेत असताना साधूंच हत्याकांड झालं. ती दुर्देवी घटना होती. कोणी त्याचं समर्थन केलं नव्हतं. त्यावेळी ज्यांच्यावर आरोप केलेले, त्यांनाच पक्षात प्रवेश दिला. पक्षात प्रवेश दिल्यावर बोभाट झाला. पाप लपून जाईल असं त्यांना वाटलं. पण पाप लपलं नाही. चव्हाट्यावर आलं. त्यानंतर घाईगडबडीत पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. त्यांचं हिंदुत्वाचं ढोंग फुटलेलं आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘भाषेवर कोणाचे खून करा, कोणाला मारा अशी आमची मागणी नाही’
“आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत.काल परवा एक दुर्देवी घटना घडली. असं घडायला नको होतं. भाषेवर कोणाचे खून करा, कोणाला मारा अशी आमची मागणी नाही. कोणात्या एका भाषेने दुसऱ्या भाषेवर अत्याचार करु नये. भाषिक प्रांतवाद सुरु झाला कुठून? मागाठणेमध्ये कोणीतरी बोललं होतं. मराठी माझी आई आहे. आई मेली तरी चालेल. आता हे असा राग पसरवतायत त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची. संघाचे जोशी घाटकोपरमध्ये गेले होते. तिथली मातृभाषा गुजराती आहे असं बोलले. भाजप-संघ हे विष पसरवतोय आणि खापर आपल्यावर फोडतोय. यातून आपल्याला राज्यातल्या भूमिपुत्रांना संभाळायचं आहे. संघर्ष करायचाय, जागते रहा. हिम्मत मनगटात असेल तर विजय दूर नसतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
