हाकेच्या अंतरावर जाऊन पाहा जय श्रीराम म्हणता येतं का? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
हाकेच्या अंतरावर असलेल्या भायखळ्यात जाऊन बघा.. जय श्रीराम म्हणता येतं का, असा सवाल करत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. वाभाऊंच्या राज्यात हिंदूंना संरक्षण आहे, असंही ते म्हणाले.

“हिंदुत्वाचा गड कुठला असं विचारलं तर सर्वप्रथम शिवडी आणि लालबागचं नाव येईल. हाकेच्या अंतरावर असलेल्या भायखळ्यात जाऊन बघा.. जय श्रीराम म्हणता येतं का,” असा सवाल करत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवडी इथल्या प्रचारसभेत त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केला. ठाकरे बंधूंनी आताच मराठीचा मुद्दा का काढला? उद्धव ठाकरेंची सत्ता एवढी वर्षे मुंबईत होती मग मराठी माणूस का बाहेर गेला, असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. इतकंच नव्हे तर “आपण सतर्क राहिलो नाही तर 16 तारखेपासून ‘जय श्रीराम’ म्हणता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जी जी स्वप्ने पाहिली ती स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली आहेत,” असंही ते म्हणाले.
“मराठी माणसाचं राहतं घर काढून घेतलं आणि यांचं मातोश्री 2 झालं आहे. आज बाळासाहेब असते तर लाथ मारून काढलं असतं. यांची चुकून सत्ता आली तर हे मंदिर इथे राहणार नाही. आम्ही म्हणतो I love Mahadev वाला महापौर बनले, मात्र वारीस पठाण म्हणतो बुरखाधरी महिला बनेल. तेव्हा हे काही म्हणाले नाहीत. आता यांच्याकडे काही नाही, असले नसलेले काहीच नाही,” असाही टोला नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना लगावला आहे.
बंगल्याबाहेर आढळलेल्या बेवारस बॅगबाबत प्रतिक्रिया
दरम्यान नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बॅग ठेवून जाताना दिसत आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “शिवडी, लालबाग हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. आम्ही देवाभाऊच्या राज्यात राहतो. मला माहीत असतं तर ज्यांनी बॅग ठेवली आहे, त्यांना बॅगमध्ये भरुन पाठवलं असतं. बॅग ठेवायच्या भानगडीत पडू नये, अन्यथा अशा ठिकाणी बॅग ठेवीन की उरलं सुरलं संपून जाईल. देवाभाऊंच्या राज्यात हिंदुना संरक्षण आहे”, असं ते म्हणाले.
अबू आझमींवर जोरदार टीका
याआधी मानखुर्द इथल्या प्रचारसभेत नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्यावर सडकून टीका केली. “धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणं आणि मानखुर्दला मागास ठेवणं हा एककलमी कार्यक्रम अबू आझमी नावाच्या कार्ट्याचा आहे. इथल्या तरुणांच्या हातात ड्रग्जच्या पुड्या देऊन त्यांना बिघडवण्याचं काम सुरू आहे. स्वतःच ड्रग्जच्या पुड्या विकायच्या आणि विधानभवनात ड्रग्ज विक्रीवर भाष्य करायचं ही दुटप्पी भूमिका अबू आझमीची आहे. आपल्या सणासुदीच्या दिवशी आपली हक्काची मिरवणूकसुद्धा इथून आपण काढू शकत नाही. या सगळ्यातून मुक्तता पाहिजे असेल तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे इथल्या भाजपा महायुतीच्या उमेदवाराला निवडून देणं हे आहे. हमको हमारे मुंबई से शिफ्ट करने के लिए यह तुम्हारे अब्बा का पाकिस्तान है क्या? ये मुंबई हमारी है.. ये मानखुर्द हमारा है,” अशी घोषणा त्यांनी या सभेत दिली.
