मतदानावर पावसाचं सावट, राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी

उद्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे (Maharashtra Assembly Elections). मात्र, या मतदानावर पावसाचं सावट असल्याची शक्यता आहे.

मतदानावर पावसाचं सावट, राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी

मुंबई : राज्यभरात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांममध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. दुसरीकडे, पुणे, पालघर, नाशिक,मनमाड, कराडमध्येही पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्रभर पुण्यात पाऊस सुरु होता, तर रविवारी (20 ऑक्टोबर) सकाळी मुसळधार पावसाला सुरवात झाली. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते हलक्या स्वरुपाचा सरी बसरण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. उद्या 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे (Maharashtra Assembly Elections). मात्र, या मतदानावर पावसाचं सावट असल्याची शक्यता आहे.

सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित : नवल किशोर राम 

रविवारी सकाळपासून पुण्यात पाऊस सुरु आहे (Pune Rain). मात्र, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही तयार असून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ‘आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान’, असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मतदारांना केलं. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची आवश्यक खबरदारी घेतली आहे. सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित आहेत. कोणत्याही मतदान केंद्रात पाण्याची गळती नसल्याचेही नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसांपासुन जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील 48 तास देखील पावसाचा अंदाज असला तरी मतदारांनी मतदान अवश्य करावे. पुणे जिल्ह्यातील मतदार सुजाण असून ते हवामानाची चिंता न करता आपला मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यालाही परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. कराडमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाने नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतीसह
बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.

पावसामुळे मका आणि बाजरी भिजून खाराब

मनमाडसह नांदगाव तालुक्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. कालपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर बरसला. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका आणि बाजरी पावसात भिजून खराब झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्याचे पीक आणि द्राक्ष बागांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. आजही तालुक्यात ढगाळ वातावरण असून पावसाची दाट शक्यता आहे. सोमवारी जर असाच पाऊस असला, तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

नांदेडमध्ये पहाटे चार वाजल्यापासून पावसांची संततधार सुरू आहे. विजांच्या गडगडाटासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस बरसतो आहे. सध्या सोयाबिन काढणीचे काम सुरु आहे, त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दुसरीकडे, परतीच्या पावसामुळे ऑक्टोबर महिन्यातील उष्णता कमी झाली आहे.

पालघरमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान 

पालघर जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कालपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पालघरमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी तांदळचं उत्पादन घेतात. मात्र, भात कापणी सुरु असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी दिवाळी अगोदर भात पीक काढून भाताची पावली विकून येणाऱ्या पैश्यांमधून दिवाळी सण साजरा करतात. मात्र यावर्षी दिवाळी आठवड्यावर आली आहे, तरी भात पीक शेतात आहेत. त्यामुळे हातात पैसे नसल्याने शेतकाऱ्यांची ही दिवाळी कोरडीच जाणार असल्याच चित्र आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI