उपचारासाठी जाताय, मग पिंजरा सोबत घेऊनच जा, कूपर रुग्णालयात उंदराचा 6 रुग्णांना चावा, नातेवाईकांचा मोठा संताप
Rat Bites to Patients at Cooper Hospital : उपचारासाठी कूपर रुग्णालयात जात असाल तर उंदीर पकडण्याचा पिंजरा, उंदीर मारण्याचे औषध सोबतच घेऊन जा. नाहीतर उपचार होता होता तुम्हाला उंदीर मामाचा फुकटचा प्रसाद मिळेल.

उपचारासाठी कुपर रुग्णालयात जात असाल तर मग ही बातमी आताच वाचा. कूपर रुग्णालयात जाताना तुमची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल. उपचारासाठी जाताना उंदीर पकडण्याचा पिंजरा, उंदीर मारण्याचे औषध सोबतच घेऊन जा. नाहीतर उपचार होता होता तुम्हाला उंदीर मामाचा फुकटचा प्रसाद मिळेल. कारण कूपर रुग्णालयात उंदरांनी उच्छाद मांडला आहे. उंदरांनी 6 रुग्णांना चावा घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
6 रुग्णांना उंदिरांचा चावा
मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये गेल्या दोन महिन्यात 6 रुग्णांना उंदिरांनी चावा घेतला आहे. विशेष म्हणजे ही माहिती, माहितीच्या अधिकारामध्ये पोलिसांकडून उपलब्ध झाली. जुहू पोलीस ठाण्याच्या आपत्कालीन पोलीस अहवालात उंदिरांच्या उच्छादाची नोंद झाली आहे. यातील अनेक घटना सप्टेंबरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. यावर रुग्णलयाच्या अधिष्ठाता डॉ. अंद्राडे यांनी सहा नाही तर 2 घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण पोलिसांकडील नोंद काही वेगळेच सांगत आहे. त्यामुळे रुग्णालय या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.
स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर
कूपर रुग्णालयात उंदिरांचा उच्छाद सुरू असल्याचाच हा या घटना पुरावा आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, त्याचाही परिणाम दिसून येत आहे. कूपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना उंदिर चावत असल्याची घटना दडवण्याचा प्रयत्न का करण्यात आला हा पण एक प्रश्न आहे. म्हणजे अस्वच्छता आणि असुविधेवर रुग्णालय पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.
समिती केली स्थापन
रुग्णालयातील अस्वच्छता आणि उंदिर चावण्याच्या घटनासमोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली. माध्यमात याविषयीचे वृत्त धडकल्यानंतर मग कूपर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. स्वच्छतेविषयी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली. समितीच्या कारवाईनंतर कंत्राटदाराकडून रुग्णालयाची सफाई करुन घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
