महाराष्ट्रातही आम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागल्या, उद्धव ठाकरे गटाचे ते दुःख पुन्हा ओठांवर, आपच्या खांद्यावरून काँग्रेसवर निशाणा, राऊतांचा काय दावा
Sanjay Raut attack on Congress : INDIA आघाडीच्या हातातून एक एक राज्य निसटत आहे. दिल्ली हातातून गेल्यावर आपच्या खांद्यावरून उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसवर अचूक निशाणा साधला आहे. आजच्या 'सामना' मधून काँग्रेसच्या धोरणावरच शंका उपस्थित करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीतील लाथाळ्या हळूहळू पुढे येत आहे. या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसच्या ध्येय-धोरणावरच घटक पक्ष शंका उपस्थित करत आहेत. INDIA आघाडीच्या हातातून एक एक राज्य निसटत आहे. दिल्ली हातातून गेल्यावर आपच्या खांद्यावरून उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसवर अचूक निशाणा साधला आहे. आजच्या ‘सामना’ मधून काँग्रेसच्या धोरणावरच शंका उपस्थित करण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एक सल व्यक्त केली. त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता अशी आगपाखड केली.
आपच्या खांद्यावरून काँग्रेसवर निशाणा
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर त्याविषयी आज सामनामधून काँग्रेसवर जहरी टीका करण्यात आली. त्याविषयी राऊतांनी माध्यमांशी बोलताना अनेक खुलासे केले. आदित्य ठाकरे आणि सर्व खासदार होते. एक कर्टसी व्हिजीट होती. जिंकल्यावर सर्व जातात. पण एक लढाऊ नेता पराभूत झाला. त्याला भेटून संवेदना व्यक्त करणं हे कर्तव्य होतं. केजरीवाल अत्यंत दुखी दिसले, असे राऊत म्हणाले.




आम्हाला सुद्धा तसाच अनुभव
काँग्रेस मला हरवण्यासाठी मैदानात होती, असं केजरीवाल यांनी सांगितल्याचं राऊत म्हणाले. त्यांनी भाजपला हरवण्यासाठी मैदानात उतरायला हवं होतं. पण केजरीवालला पराभूत करणं हे त्यांचं लक्ष्य होतं, असं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की, तुम्ही हरियाणा आणि दिल्लीत काँग्रेससोबत आघाडी करून लढला असता तर तुम्ही जिंकला असता. त्यावर आम्ही प्रयत्न केले पण यश आलं नाही असं केजरीवाल म्हणाले. तर राहुल गांधी यांचीही तीच इच्छा होती, असे केजरीवाल्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
त्याचवेळी राऊतांनी काँग्रेसचा आलेला कटू अनुभव एका वाक्यात मांडला. महाराष्ट्रातही आम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागल्या आहेत, असे दु:ख त्यांच्या ओठांवर आले. त्यामुळे विधानसभा असो की लोकसभा निवडणूक असो, त्यावेळी वाटाघाटीत बऱ्याच हातीशी असलेल्या जागांवर पाणी सोडावे लागल्याचे यापूर्वी सुद्धा ठाकरे गटाने स्पष्ट केले होते. तोच उमाळा पुन्हा आल्याचे दिसून आले.
रामदास कदम यांच्यावर टीका
दुसऱ्यांना तोंडं नाहीत का. तोंडं सर्वांना आहेत. जो बाटगा असतो तो जोरात बांग देतो. या विषयावर फार चर्चा न केलेली बरी. त्यांचा शत्रू कोण आहे. हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ज्या बाळासाहेबांनी त्यांना सत्तेची पदं दिली, वैभव दिलं आम्हा सर्वांनाच त्यांच्या विषयी अशी विधाने करणं हे नैतिकतेला धरून नाही आणि माणुसकीला धरून नाही, अशी टीका त्यांनी रामदास कदम यांच्यावर केली.
आज सत्तेवर आहात. उद्या सत्तेवर नसाल हे लक्षात घ्या. मग अशी विधाने करा. कधीकाळी आपण सहकारी होतो, उद्धव ठाकरे तुमचे नेते होते. त्यांच्यासोबत तास न् तास चर्चा केली. आमदारकी, मंत्रीपद दिलं आहे. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी दोन वेळा विधान परिषदेत पाठवलं होतं. ही कृतज्ञता माणसात नसेल, तर माणुसकी शून्य आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.
भास्कर जाधव यांच्याविषयी मोठे वक्तव्य
भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. तुम्ही ज्या बातम्या देता त्या चुकीच्या आहेत. कोकणात जाधव हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे. बाळ माने हे त्यांचे नातेवाईक आहे. भास्कर जाधव यांना निरोप उशीरा गेला कारण मेसेज उशिरा गेला. माझी त्यांच्याशी चर्चा झाली. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आपण ऑनलाइन चर्चा करू. पण काय झालं मातोश्री परिसरात जामर असल्याने वायफायचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. त्यांना यायचं होतं. मी आता निघालो तर यायला ८ वाजतील असं ते म्हणाले. कुटुंबात लग्न असल्याने ते गुहागरला थांबले आहेत, असा खुलासा राऊतांनी केला.
भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही पक्षात चर्चा करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे. उगाच तुम्ही हे आले नाही, ते आले नाही, ते रुसले, ते फुगले करता. रुसा फुगायला ते काय एकनाथ शिंदे आहेत का? रुसून गावी जाऊन बसायला. आमचा सर्वांशी संवाद आहे. काल सर्व नेते उपस्थित होते, असा दावा राऊतांनी पत्रपरिषदेत केला.