Eknath Shinde : कुठे आहेत एकनाथ शिंदे? बंकरबिंकरमध्ये लपून बसलेत काय? संजय राऊत यांचा संतप्त सवाल
Sanjay Raut on Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण स्थिरावले होते. पण आता राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. हिंदीविरोधी मोर्चात दोन ठाकरे एकत्र येत आहे. तर दुसरीकडे राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचले आहे.

2019 मधील विधानसभा निवडणुकीपासून राज्यात राजकारणातील मोठे भूकंप अनुभवले. राज्यातील राजकारणातील उलथापालथीने जनतेच्या पोटात गोळा आला होता. 2024 मधील विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकारणाने अनेक बदल पचवले आणि राजकारण स्थिरावले होते. आता हिंदी विरोधाच्या निमित्ताने दोन ठाकरे एकत्र येणार असल्याने राज्याचे राजकारण मोठी कूस बदलणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. या घडामोडी घडत असतानाच खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.
जे राज्याच्या मनात तेच होईल
मी वारंवार सांगतो की, उद्धव ठाकरेही सांगत आहे, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते करीन. त्या संदर्भात माझ्या मनात कोणताही अहंकार, इगो असा कोणताही व्हायरस नाही. कालच्या मोर्चाबाबतही त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. दोघांच्याही सोयीची आहे, महाराष्ट्राच्या सोयीची आहे. उद्धव आणि राज यांनी जी भूमिका मागितली होती. त्यात दोघांनीही मान्यता दिली. आषाढी मुळे ६ तारीख गैरसोईची आहे. ती त्यांनी मान्य केली. आणि 5 तारीख जाहीर केली, अशी माहिती राऊतांनी आजच्या पत्र परिषदेत दिली.
दोघे भाऊ मनाने एकत्र
दोघे भाऊ मनाने एकत्र आले आहेत. भाषा विषय आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाषेच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो, तसा लढा उभा करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकऱ्यांना वाटतेय यात काही चुकीचं आहे, असं वाटत नाही. आताही मुंबई तोडण्याचा प्रयत्न होत आहे., तेव्हाही होत होता. आताही लढा उभारावा लागेल. त्याचं नेतृत्व ठाकऱ्यांनाच करावं लागेल, असे म्हणणे राऊतांनी मांडले.
सर्व पक्षांना निमंत्रण जाईल. हा राजकीय मोर्चा नाही. सुप्रिया सुळे यांनी कडवट भूमिका मांडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत काल चर्चा झाली. राजकीय जोडे बाजूला ठेवण्याचं आवाहन दोन्ही ठाकरेंनी केलं आहे. ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, ते म्हणाले.
त्यांना सांगा डोकं ठिकाणावर ठेवा
जास्तीत जास्त भाषा शिकलं पाहिजे विनोबा भावेंना २४ भाषा येत होत्या, नरसिंह राव यांना १३ भाषा येत होत्या, आम्हाला चार पाच भाषा येतात. आम्हाला उदय सामंतांच्या शिकवणीची गरज नाही. आम्ही शालेय शिक्षणाचं म्हणतोय. त्यांना सांगा डोकं ठिकाणावर ठेवा. इयत्ता चौथी, शालेय शिक्षणात लहान मुलांवर अशा प्रकारे भाषेची सक्ती करता येणार नाही. हा विषय सक्तीचा आहे. माशेलकरांचा अहवाल काय असेल हा विषय नाही. प्रत्येक राज्यात असा अहवाल देतात. समिती नेमतात. तेच कागद फडकवून दाखवू नका, अशी टीका त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केली.
एकनाथ शिंदे कुठं लपून बसलेत?
सरकार काय विचार करेल हा सरकारचा विषय आहे. फडणवीस, मिंधे, अजित पवार यांचं जे सरकार आहे. त्यांना या विषयावर भूमिका नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसले आहे. शिवसेना म्हणवून घेणार्या एकनाथ शिंदेंचं मला आश्चर्य वाटतं. कुठे लपून बसले. त्यांनी काय बंकर बिंकर केलाय का. याविषयावर ते काहीच बोलत नाही, असा टोला राऊतांनी लगावला. उदय सामंत कोणती भूमिका मांडत आहेत. ते शिंदेंचे मंत्री आहेत ना. त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडली पाहिजे. शिंदे गटाच्या लोकांनी मराठी माणसाची भूमिका ठाम घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हे सरकार आम्हाला तुरुंगात टाकेल
अभिजात भाषेचा दर्जा देतो म्हणून दुसऱ्या भाषेची सक्ती करावी लागेल असं त्या पत्रात राष्ट्रपतींनी दिलं का. तामिळनाडूत अशी सक्ती आहे का, गुजरातमध्ये आहे का, केरळ, कर्नाटक आणि ओडिशात आहे का. महाराष्ट्रात का. आम्ही जो मराठी भाषेचा पुरस्कार करतोय त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतील अशी मला भीती वाटते. कुणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुडदा पाडायला हे सरकार निघालं आहे. मराठी भाषेचा गजर करत आहात हा गुन्हा आहे या महाराष्ट्रात. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांनी आम्हाला तुरुंगात टाकतील, असे राऊत म्हणाले. गुणवंत सदावर्ते हे फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत. त्या पोपटांकडे लक्ष देऊ नका, असा टोला राऊतांनी लगावला.
