पत्नीला मांडीत बसवून अभिनेत्याचं ड्रायव्हिंग, सहा जणांना उडवलं, दोघांचा मृत्यू

9 जूनला शिवडीतील जकारिया बंदर बस स्टॉपवर अभिनेता शाहबाज बादीच्या गाडीने सहा जणांना टक्कर दिली होती. अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:54 AM, 29 Sep 2019
पत्नीला मांडीत बसवून अभिनेत्याचं ड्रायव्हिंग, सहा जणांना उडवलं, दोघांचा मृत्यू

मुंबई : टीव्ही अभिनेता शाहबाज बादीच्या गाडीने (Shahbaz Badi Car Accident) मुंबईत तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीनुसार अपघाताच्या वेळी शाहबाजच्या मांडीत त्याची पत्नी अमरीन बसल्याचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे.

अपघात झाल्यानंतर कार उलटल्यामुळे अमरीन तिच्या सीटवरुन पडली आणि माझ्या मांडीत आली, असा दावा शाहबाजने केला आहे. अपघाताच्या आधी अमरीनला आपल्या मांडीत बसल्याचं कोणी पाहिलं नव्हतं, याकडे त्याने लक्ष वेधलं आहे. आरके मार्ग पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.

अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं, तेव्हा शाहबाजचा एक पाय ब्रेकजवळ, तर दुसरा गिअरबॉक्सजवळ होता. त्यामुळे अमरीन त्याच्या मांडीत असल्याचा दावा (Shahbaz Badi Car Accident) त्यांनी केला आहे. अपघाताच्या काही काळ आधी काढलेल्या एका सेल्फीच्या आधारे शाहबाजचे वकील मुबीन सोलकर यांनी प्रत्यक्षदर्शींचा दावा खोडून काढला आहे. या सेल्फीमध्ये अमरीन शाहबाजच्या बाजूच्या सीटवर बसल्याचं दिसत आहे.

भररस्त्यात तरुणीला ‘आयटम’ म्हणणाऱ्या मुंबईकर तरुणाला बेड्या

अमरीन अपघाताच्या आधी माझ्या मांडीत होती, हे कोणीही सिद्ध करु शकलेलं नाही. अपघाताच्या वेळी अमरिनने सीटबेल्ट घातला होता. तसंच रक्ताच्या नमुन्यानुसार अपघातावेळी आपण मद्याच्या अंमलाखाली नव्हतो. त्यामुळे आम्ही नको त्या अवस्थेत असल्याचा आरोप केला जात आहे, असा दावाही शाहबाजने केला. कोर्टाने शाहबाजला जामीन मंजूर करत हा अपघात होता की सुनियोजित गुन्हा, हे अद्याप सिद्ध होऊ न शकल्याचा निर्वाळा दिला.

काय आहे प्रकरण?

9 जूनला मुंबईतील शिवडी परिसरातील जकारिया बंदर बस स्टॉपवर शाहबाजच्या गाडीने सहा जणांना टक्कर दिली होती. अपघातात 25 वर्षीय कल्पेश आणि त्याचा 18 वर्षीय नातेवाईक दर्शन यांचा मृत्यू झाला. शाहबाज, त्याची पत्नी अमरीन आणि दोघं जण अपघातात जखमी झाले. कलम 279 ( निष्काळजीपणे भरधाव वाहन चालणे), 304-अ (निष्काळजीने मृत्यूस कारणीभूत ठरणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. 13 जूनला त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.