शिवाजी पार्क ठाकरेंचेच, मुंबई की ठाणे? शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं नवं ठिकाण ठरलं?
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदा कुणाचा दसरा मेळावा गाजणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
Shivsena Shinde Group Dussehra Melava : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे लागले आहे. शिवसेनेत फूट पडण्याआधी दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडत होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदा कुणाचा दसरा मेळावा गाजणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाकडूनही यंदाही दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजे बीकेसीमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी विविध जागांची चाचपणी केली जात आहे. यानुसार आझाद मैदान आणि बीकेसी या दोन जागांची चाचपणी करण्यात आली आहे. पण अखेर शिवसेना शिंदे गटाकडून बीकेसीमध्ये दसरा मेळावा ठेवण्याबद्दल शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या दसरा मेळाव्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजे बीकेसीमध्ये ४० हजार पेक्षा जास्त लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पितृपक्ष संपताच कामाला सुरुवात केली जाणार आहे. यंदा साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या थीमवर हा कार्यक्रम करण्यात येणार आहे, असे बोललं जात आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
एकनाथ शिंदेंनी मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये – संजय राऊत
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदेंनी मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये. तुमची दसरा मेळाव्याची जागा सूरतला आहे, जिथे यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला दोन-अडीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे यांना दसरा मेळावा घेण्यासाठी दोन जागा आहेत जिथे ते दसरा मेळावा आयोजित करु शकतात. यातील पहिलं ठिकाण म्हणजे सूरत आणि दुसरं म्हणजे गुवाहाटी. कामाख्या मंदिराच्या समोर किंवा ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तिकडे ते दसरा मेळावा घेऊ शकतात. सूरत हे सर्वात चांगला पर्याय आहे, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सूरत मध्ये झाला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता.