केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे, तो मोठ्या प्रमाणावर वापरला पाहिजे : उद्धव ठाकरे

एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, दुसरीकडे लस घेण्यासाठी लसींचाच तुटवडा असल्याचं वारंवार उघड होतंय.

केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे, तो मोठ्या प्रमाणावर वापरला पाहिजे : उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई : एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, दुसरीकडे लस घेण्यासाठी लसींचाच तुटवडा असल्याचं वारंवार उघड होतंय. यावरुनच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या लसी पुरवठा धोरणावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. केंद्र सरकारने दिलेल्या 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच केंद्राकडून राज्याला दिल्या जाणाऱ्या लसींपैकी 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचं धोरण असल्याचंही नमूद केलं. यातून ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या लस तुटवड्याची जबाबदारी केंद्राकडे असल्याचं म्हटलंय.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज सुमारे 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोव्हिडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे.”

“केंद्राकडून 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचे धोरण”

“केंद्राकडून 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्याचे धोरण असून उद्योगांनी त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्या कामगारांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे,” असेही ते म्हणाले. उद्योगांच्या प्रतिनिधींनी देखील कोव्हिडच्या या साथीत राज्य शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे तसेच  उद्योगांच्या परिसरात कोव्हिड सुसंगत वर्तणूक राहील याची काळजी घेण्याची खात्री दिली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील यासंदर्भात उद्योगांशी समन्वय ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.

“आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे”

“छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली”

उद्धव ठाकरे म्हणाले, “डेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे.”

यावेळी बोलतांना डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पहिल्या लाटेत 20 लाख रुग्ण आढळले, तर दुसऱ्या लाटेत दोन तीन महिन्यातच 40 लाख रुग्ण आढळले. पुढील लाटेचा वेग कितीतरी जास्त असू शकतो. सद्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहेत.

हेही वाचा :

‘देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही’, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज्ज, 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांचे प्राधान्याने लसीकरण 

कोल्हापूर जिल्ह्यासाठी लसीचे 60 हजार डोस, लसीकरणाला आठवड्याभरानंतर सुरुवात

व्हिडीओ पाहा :

Uddhav Thackeray on Corona vaccine shortage and Policy of Modi government

Published On - 7:30 pm, Mon, 12 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI