Uddhav-Raj Thackeray: जागा वाटपात मोठा पेच? उद्धव ठाकरे शिवतीर्थावर; मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंशी चर्चा करणार?
Uddhav Thackeray-Raj Thackeray: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली आणि घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे हे पुन्हा शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. जागा वाटपात मोठा पेच निर्माण झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानल्या जात आहे.

Shivsena-MNS: ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा या वर्षी मे महिन्यात उद्धव ठाकरे यांनी वरळी डोममध्ये केली होती. ठाकरे ब्रँड येत्या मुंबई महापालिकेत दाखवून देऊ अशी चर्चा तेव्हापासून सुरू आहे. पण आता निवडणूक तोंडावर आलेली असताना जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचा दावा सूत्र करत आहेत. युती होण्याअगोदर जागा वाटपातील ताणलेले मुद्दे सोडवण्यासाठीच आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
227 जागांमध्ये मनसेला किती जागा?
227 जागा असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला महत्त्वाच्या जागा हव्या आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे सेनेतील नेते आणि मनसेतील नेते यांच्यात चर्चेची एक फेरी झाल्याचे समजते. पण त्यात काही जागांवरून मतभिन्नता दिसून आली. काही जागांवर दोन्ही पक्ष आग्रही असल्याने तिढा निर्माण झाला. या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याचे समजते. त्यानंतर जागा वाटपात पेच निर्माण झाल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मनसे आणि उद्धव सेना यांच्यात 75 जागांवर खलबतं सुरू असून त्यावर तोडगा काढण्याची कसरत करावी लागणार असल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मनपा निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या गेल्या तर काय करायचं यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.सध्या महायूतीत सुरू असलेल्या धूसफूस आणि पक्ष प्रवेशावरही दोन्ही भावांमध्ये चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे हे गेल्या अर्धा तासांपासून शिवतीर्थावर आहेत. तर वरुण सरदेसाई पण येथे दाखल झाले आहेत. 2017 च्या जागा वाटपाआधारे आता मनसे आणि उद्धव सेनेत विचार व्हावा असे उद्धव सेनेचे म्हणणे आहे. तर मनसेने मात्र जागा वाटपाचे धोरण नवीन पद्धतीने व्हावे अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या धोरणावरून पेच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा पेच सोडवण्यासाठीच उद्धव ठाकरे आज राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध करत असल्याने याविषयीची चर्चा सुद्धा या भेटीत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी चर्चा होऊ शकते. राजकीय मोटमध्ये सर्वच विरोधी पक्ष असण्याबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तुटेपर्यंत ताणले जाऊ नयेत यासाठी दोन्ही बंधु सक्रिय झाल्याचे या भेटीतून स्पष्ट होते आहे.
