विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे ढोंगच, सोहळ्याआधीच ‘सामना’तून हल्लाबोल; उद्धव ठाकरे गैरहजर राहणार?

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 7:56 AM

राज्यात शिवसेना प्रमुखांची चोरी करण्याचा विषय सुरू आहे. या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हातभार लावत आहेत, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला हे ढोंग मान्य नाही.

विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे ढोंगच, सोहळ्याआधीच 'सामना'तून हल्लाबोल; उद्धव ठाकरे गैरहजर राहणार?
Image Credit source: tv9 marathi

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? अशी चर्चा रंगलेली असतानाच मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून या तैलचित्र अनावरण सोहळ्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंगच आहे, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे.

आमचे नाते मोदींशी आहे असं सांगणारे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव का घेत आहेत? विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचं ढोंग रचलंय ते कशासाठी? एक तर तैलचित्रात निष्ठेच्या तेजाचा अंश नाही. ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेईमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणतं चित्रं रंगवत आहात? असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

तैलचित्रात निष्ठेचा आत्मा, तेज नाही

तसेच बाळासाहेब ठाकरे हे पुण्यवान अमर आत्मा आहेत. त्यांचे चित्रं लोकांच्या हृदयावर कोरले गेले असून ते प्रामाणिक आहे. स्वाभिमानाचा कुंचला आणि निष्ठेच्या रंगाने हे चित्र अमर झाले आहे. विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा आणि तेज नसल्याने 40 बेईमानांच्या ढोंगाशिवाय या सोहळ्यात दुसरे काहीच दिसत नाही, असा हल्लाही अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.

शिवसेनेचा बाप कोण?

मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे. तसेच उद्याचे भविष्य शिवसेनेचे आहे. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा केला. पण आपला बाप आणि पाठिराखा दुसराच कोणी असल्याचा दावा परदेशात केला. त्यामुळे शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली निघाला आहे.

त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआपच दूर झाले आणि काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटे हीच बाळासाहेबांना आदरांजली असल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

पेंढा भरवलेला कोल्हा खुर्चीवर

भाजपने एक पेंढा भरवलेला कोल्हा खुर्चीवर बसवलेला आहे. त्या कोल्ह्याला काडीची किंमत नाही. लाचारी आणि गुलामीची हद्द पार करत त्यांनी आम्ही मोदींची माणसं आहोत, असं जाहीर केलं. त्यामुळे शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप आणि त्यांच्या हस्तकांनी केलं हे कळलंच असेल, असा दावाही करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

चोरीमारीस पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा हातभार

राज्यात शिवसेना प्रमुखांची चोरी करण्याचा विषय सुरू आहे. या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हातभार लावत आहेत, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला हे ढोंग मान्य नाही. गेल्या पाच महिन्यात राज्यात ढोंगबाजीने कहर केला. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले. त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला, असा हल्लाही करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI