Sanjay Raut : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचं मत कुणाच्या पारड्यात?, संजय राऊत यांनी वाढवलं टेन्शन; काय म्हणाले?
Sanjay Raut on vice presidential election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लवकरच होत आहे. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडीने त्यांचे स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. पण ठाकरे सेनेचे मत कुणाच्या पारड्यात पडणार? राऊतांनी दिले मोठे संकेत...

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झाले आहे. त्या जागेवर आता निवडणूक होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी या दोघांनीही स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. भाजपनं सीपी राधाकृष्णन यांचं नाव समोर केलं आहे. तर इंडिया आघाडीकडून उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरण्यात आला. त्यामुळे कोण उमेदवार निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण ठाकरे सेनेचे मत कुणाच्या पारड्यात पडणार? राऊतांनी दिले मोठे संकेत…
पाकसोबत खेळण्याबाबत केली टीका
हिंदुस्थानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान, त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त जन्मालाच आला नाही, त्यांनी काल त्यांच्या सरकारने एशिया चषक क्रिकेट सामने खास करून पाकिस्तान बरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला हा प्रकार धक्कादायक आहे, नरेंद्र मोदी,अमित शहा, राजनाथ सिंग यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा ओरबडून काढण्याचा निकाल काल त्यांनी घेतला. मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारले, पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खुमखुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण पहेलगाम मध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना विचारलत का, त्यांच्या भावना समजून घेतल्यात का? आपली अशी कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार आहात असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
जय शाह यांच्यावर टीका
ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत, मग ऑपरेशन सिंदूर संपलेले नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेल आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचं आहे. या देशातले लोक तिकडे जाणार मॅच बघायला, अमित शहा यांचे सुपुत्र, गुजरातचे सुपुत्र जय शहा ते दुबईत भारत-पाक सामन्याला बसणार ऐटीमध्ये आणि भारताच्या जनतेने पाकिस्तान विरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हुतात्म्य पत्करायचं, जनतेने प्राण गमवायचे आणि हे पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे ट्रेड करणार अशी टीका त्यांनी केली.
आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने
दरम्यान ठाकरे सेना हे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उद्धव ठाकरे यांना एनडीए उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी कॉल केला होता. पण आता उद्धव सेनेचा उमेदवार कोण हे स्पष्ट झाले आहे. याविषयी संजय राऊत यांनी बाजू मांडली. आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला, उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या, आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी जी चर्चा केली ती पक्षात केली, त्यांनी आम्हाला फडणवीसांचा फोन आल्याची माहिती दिली, असे राऊत म्हणाले.
