निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडले? बाळासाहेब थोरात यांनी थेट सांगितले
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ही चुकीची यादी घेऊन निवडणुका घेणे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

राज्यात सध्या मतदार याद्यांचा गोंधळ सुरु आहे. आता याप्रकरणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. या बैठकीनंतर नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. ही चुकीची यादी घेऊन निवडणुका घेणे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीतही घोळ
आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार यादीतील दोषांकडे लक्ष वेधले होते, परंतु आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिणामी, ती निवडणूक दोषासहीत झाली. आमदार सांगतात, की २० हजार मतदान बाहेरून आणले गेले. काहींची नावे वगळली गेली, तर तीच नावे वारंवार दिसत आहेत. हॉस्टेलमध्ये राहणारे बाहेरच्या राज्यातील लोकही मतदार म्हणून दाखवले जात आहेत. अशा अनेक घोटाळ्यांनी भरलेली मतदार यादी विधानसभा निवडणुकीत होती, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
केंद्राची जबाबदारी
बाळासाहेब थोरात यांनी यादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. गेल्या सहा-सात महिन्यात यादीचे पुनर्विलोकन करण्यात आले नाही, दुरुस्ती झाली नाही. केंद्राची जबाबदारी होती, त्यांनी ते केले नाही. तर राज्य निवडणूक आयोग म्हणतो, आमचा संबंध नाही. त्यामुळे याच दोषी यादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र आहे, जे योग्य नाही, असे मत थोरात यांनी मांडले.
हे निकोप लोकशाहीसाठी घातक
आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटलो. पण आमचे समाधान झाले नाही. निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही. या चुकीच्या यादीसोबतच निवडणूक होणार आहे. हे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा देश पातळीवर मांडला, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. कॉलेजच्या मालकांकडून बाहेरून आलेल्या लोकांची नावेही मतदार म्हणून यादीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. त्यामुळे मतदार यादीतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : निवडणुका कशाला घेता, त्यापेक्षा थेट ठराविक… उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले
अजित पवारांच्या गटाला धक्का, आमदाराकडून पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कारणही सांगितले
