Ajit Pawar : ठरलं! राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांना नारळ भेटणार, अजितदादांनीच दिला थेट इशारा, पहिला नंबर कुणाचा?
Ajit Pawar on Minister : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर झालं. या चिंतन शिबिरानं राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची चिंता वाढवली आहे. या चिंतेवर त्यांना चिंतन करावे लागणार आहे आणि लागलीच कृती करावी लागणार आहे. नाही तर त्यांना नारळ देण्याचं पक्कं झालं आहे...

Resign Ministership : नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर सुरू आहे. विदर्भ गेल्या काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे. त्यापूर्वी शिवसेना, काँग्रेसने पण इथं जागा मिळवल्या होत्या. मधल्या काळात अजितदादांच्या राष्ट्रवादींनं पण वऱ्हाडात चांगली राजकीय मांड ठोकली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत पकड मिळवण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. या चिंतन शिबिरात काही मंत्र्यांची चिंता वाढली आहे. कारण अजितदादांनी आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे कान टोचले आहेत. काय म्हणाले दोन्ही नेते? कुणासाठी आहे हा धोका?
पर्यटनासाठी अजिबात येऊ नका
यावेळी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चांगलीच कानउघडणी केली. “आमचे पण अनेक मंत्री येतात. मी कुणाचे नाव घेऊन विशेष काही सांगू इच्छित नाही. पण शिबिराला अथवा कार्यक्रमांना पर्यटन म्हणून मेहरबानी करून येऊ नये. आमच्याकडे केवळ दोन तासांसाठी येऊन, तोंड दाखवून, मुंबईत दादांकडे, अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे हजेरी लावली की झालं असं नाही. मी या जिल्ह्यात जाऊन आलो, तिकडं जाऊन आलो, असं नको. यायचं असेल तर योग्य मार्गाने या. आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल. ताकद कशी मिळेल. याच्यासाठी यायचं असेल तरच या. मंत्र्यांनी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी झेंडा वंदनासाठी येऊ नये. मंत्र्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी जरी झेंडा वंदन केले तरी आम्हाला चालेल.” असे त्यांनी सुनावले.
तर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल
तर अजित पवार यांनी सुद्धा त्यांच्या मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. “मी आज निर्वाणीचं सांगतो, जर पक्षापेक्षा काही मंत्री महोदयांना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूयात. दुसऱ्याला कुणाला देऊयात. तरच त्यांना कळेल. माझ्यासहीत अनेकांना छोट्या-मोठ्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, एवढीच नोंद आपण सर्वांनी घ्यावी.” असे अजितदादांनी त्यांच्या पक्षांच्या मंत्र्यांना ठणकावले. चिंतन शिबिरातील अनुपस्थितीवरून हा विषय निघाला की काही मंत्री सक्रीय सहभाग नोंदवत नसल्याचे निरीक्षण समोर आले. त्यावरून मंत्र्यांना थेट नारळ देण्याचा विषय समोर आला हे अद्याप समोर आलेले नाही. आता पहिले नारळ कोणत्या मंत्र्यांच्या हातात पडते याकडे राष्ट्रवादीच्या नेत्याचं लक्ष लागलं आहे.
