‘या’ शहरांमध्ये १० मेपासून पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट बंद होणार? जाणून घ्या काय आहे कारण!
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले की आपण सहज मोबाईल काढून QR कोड स्कॅन करतो, नाही का? पण नागपूरकरांनो, तुमच्या या सवयीला लवकरच ब्रेक लागण्याची चिन्हं आहेत!कारण १० मे नंतर शहरातील पेट्रोल पंपांवर कदाचित फक्त 'कॅश'च चालेल. का घेतला जातोय हा निर्णय? चला, जाणून घेऊया

नागपूरसह संपूर्ण विदर्भातील वाहनचालकांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. १० मे २०२५ पासून पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट जसे की UPI, QR कोड, कार्ड पेमेंट – स्वीकारले जाणार नाही. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (VPDA) ने हा निर्णय घेतला असून, यामुळे ग्राहकांनी गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरताना खिशात रोकड असणं आवश्यक ठरणार आहे. सध्या सामान्य ग्राहक QR कोड स्कॅन करून क्षणात पेमेंट करत असतो, मात्र लवकरच ही सवय मोडीत निघणार आहे.
का घ्यावा लागला असा निर्णय?
हा निर्णय का घ्यावा लागला यामागे एक गंभीर कारण आहे, सतत वाढत असलेल्या सायबर फसवणुकीचे प्रकार. VPDA चे अध्यक्ष अमित गुप्ता यांच्या मते, अनेक सायबर गुन्हेगार पेट्रोल भरल्यानंतर बनावट डिजिटल ट्रान्झॅक्शन दाखवतात. त्यानंतर ते राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर खोटी तक्रार दाखल करून पेट्रोल पंप मालकांचे बँक खाती फ्रीज करतात. यामुळे व्यवसाय ठप्प होतो आणि मालकांना लाखोंचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. याच समस्येवर तोडगा म्हणून, विदर्भातील अनेक पेट्रोल पंप चालक आता केवळ कॅश व्यवहार स्वीकारणार आहेत.
नागपूरकरांनी काय करावं?
या निर्णयामुळे नागपूरसह इतर शहरांतील वाहनधारकांना अचानक गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. डिजिटल पेमेंटची सवय झालेल्या ग्राहकांनी आता प्रवासाच्या वेळी पुरेशी कॅश बरोबर ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा पेट्रोल भरताना अडचण येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी ही माहिती गांभीर्याने घेऊन, १० मेपासून ‘या’ नव्या नियमाची तयारी सुरू ठेवावी.
एकीकडे सरकार ‘डिजिटल इंडिया’च्या माध्यमातून कॅशलेस व्यवहारांचा प्रचार करत असतानाच, दुसरीकडे सायबर फसवणूक हा मोठा अडथळा ठरत आहे. व्यापाऱ्यांना सुरक्षितता आणि नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे. ग्राहकांनीही ही समस्या समजून घेत बदल स्वीकारणं हे आता गरजेचं बनलं आहे.