कोरोनाच्या नव्या विषाणूच्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांचे निर्देश

कोविड रुग्ण वाढून पुन्हा लॉकडाऊन लागू नये, या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे यासाठी पुन्हा जनजागृती करावी. मास्क न वापरणारे, नियम तोडून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांचे निर्देश
संग्रहित छायाचित्र.

नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या उत्परिवर्तीत विषाणूला अटकाव करण्यासाठी कोकण विभागातील यंत्रणांनी आतापासूनच दक्ष रहावे. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे चाचणी किट्स मिळण्याबाबत पाठपुरावा करावा. कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी. तसेच कोकण विभागातील ऑक्सिजन प्लान्टची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. कोविड काळात तयार करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी आज येथे दिले.

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या उत्परिवर्तीत विषाणूमुळे येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेला अटकाव करण्यासंदर्भात आज विभागीय आयुक्त पाटील यांनी विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी संभाव्य लाटेच्या तयारीचा आढावा घेतला व पुढील काळात राबवावयाच्या उपाययोजनांबद्दल सूचना केल्या.

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश

सध्या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तीत विषाणूचा धोका राज्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील प्रशासनाने आतापासून तयारी करावी. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवनवीन उपक्रम राबवावेत. लसीकरणाबाबत गावपातळीवर जनजागृती करावी. जिल्ह्यात लसींच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचा तुटवडा होणार नाही, हे पहावे.

विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष द्यावे. प्रवाशांच्या विलगीकरणासाठी नियोजन करावे. परदेशातून कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यांच्या कोविड चाचण्यांबाबत विशेष नियोजन करावे. कोविड रुग्ण वाढून पुन्हा लॉकडाऊन लागू नये, या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे यासाठी पुन्हा जनजागृती करावी. मास्क न वापरणारे, नियम तोडून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील ज्या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहेत. त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.

ऑक्सिजन निर्मितीवर भर द्यावा

कोकण विभागात सध्या किती ऑक्सिजन निर्मिती होत आहे. किती प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे, याचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. त्याअनुषंगाने ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्टवर्क करण्याची संकल्पना यावेळी विभागीय आयुक्तांनी मांडली.

सर्व महसूल कार्यालयांनी प्राथमिक तत्त्वावर ई-ऑफिस, ऑनलाईन पेन्शन प्रणालीसारख्या अद्यावत कार्यप्रणालींच्या वापरावर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी केल्या. यावेळी विविध उपक्रमांच्या अहवालांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच जलजीवन अभियानाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. महाआवास अभियानात कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांकावर राहून उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत आयुक्तांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. (The administration should be prepared to stem the tide of the new corona virus, vilas patil)

इतर बातम्या

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार : उदय सामंत

Mamata Banerjee in Maharashtra: उद्धव ठाकरे लवकर बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना; ममतादीदी म्हणाल्या; जय मराठा, जय बांग्ला

Published On - 6:53 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI