‘ अजित पवार गद्दार, काकांच्या मृत्यूची बघत होते वाट ‘, राष्ट्रवादीच्या या नेत्याचा घणाघाती हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. ते गद्दार आहे, काकांच्या मृत्यूची वाट बघत होते. आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वाट पाहतो का ? ज्या मुलाला हात धरून चालायला शिकवलं, त्या मुलानेच काकांना बाहेरचा रस्ता दाखवला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

लोकसभा निवडणूकांची धामधूम संपली असून आता राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. महाराष्ट्रात या वर्षाखेरीस विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना भलताच वेग आला आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अजित पवार गद्दार असल्याचे सांगत, अशा व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकाल का ? त्यांच्यावर विश्वास ठेवू शकाल का ? भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवता येईल ? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
काकांच्या मृत्यूची पाहिली वाट….
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला. ते ( अजित पवार) काकांच्या ( शरद पवार) मृत्यूची वाट पहात होते. आपण कधी एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वाट पाहतो का ? ज्या मुलाला चालायला शिकवलं, त्यानेच काकांना बाहेरचा रस्ता दाखवला. अशा गद्दारांना राज्यातील जनता एक दिवस जरूर धडा शिकवेल आणि याचा हिशोब चुकता करेल, अशा शब्दांत आव्हाडांनी अजित पवारांवर तोफ डागली.
आधीही केली होती अजित पवारांवर टीका
यापूर्वीही अनेकवेळा आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करत हल्ला चढवला होता. अजित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे, भाजपशी हातमिळवणी करून पक्ष त्यात विलीन करायचा आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वीच आव्हाडांनी केला होता. यासाठीच त्यांनी शरद पवार यांना धोका दिला. ‘ पवार कुटुंबात जन्म घेतल्याबद्दल अजित पवारांनी आभारी असले पाहिजे. काकांविरोधात बंड करूनही त्यांना महत्वाची पद दिल्याबद्दल त्यांनी आभारी असायला हवं ‘ असंही आव्हाड म्हणाले होते.
2023 मध्ये, अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि भाजपशी हातमिळवणी केली. महायुतीमध्ये सामील झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्रीही बनले. राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितलां. तेव्हा निवडणूक आयोगाने अजित पवार यांचाच पक्ष अस्सल असल्याचे सांगत शिक्का मारला आणि निवडणूक चिन्हही त्यांच्याच ताब्यात दिले. पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले. राज्यात महायुतीच्या मोठा फटका बसला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही अवघा एक उमेदवार निवडून आला. त्यामुळे या कमकुवत कामगिरीनंतर अजित पवारांचा प्रभावही कमी झाला आहे. या निकालावर शरद पवार गट खूश असला तरी खरी परीक्षा ही विधानसभेची असेल असे मानले जात आहे.
