
संपूर्ण राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची चर्चा आहे. खासकरून मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे कारणही खास आहे, कारण या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला धूळ चारण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या समोर यायला सुरुवात झाली आहे. यात अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. कोणत्या पक्षाने कोणच्या नेत्याच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली याची माहिती जाणून घेऊयात.
राजकारणात नेहमी घराणेशाहीवर टीका केली जाते. देशातील अनेक राजकीय पक्ष घराणेशाहीच्या विरोधात आहेत. मात्र जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये एकाच घरातील अनेकांना उमेदवारी दिली जाते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपने नेत्यांच्या घरातील उमेदवारांना तिकीट जाहीर केले आहे.
दरम्यान, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने युती केली आहे. तर भाजप आणि शिवसेना महायुकीत लढणार आहेत. तसेच काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे.