मोठी बातमी! छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, मराठ्यांचा OBC त समावेश केला तर…पुन्हा मुंबई जाम होणार?
आज (1 सप्टेंबर) छगन भुजबळ यांच्या उपस्थित राज्यातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अन्यथा आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ, असा इशाराच भुजबळ यांनी दिला आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा जास्तच तापण्याची शक्यता आहे.

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil : मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला हवे, अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. याच मागणीला घेऊन ते मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभराताल्या ओबीसी संघटनांकडून मात्र जरांगे यांच्या मागणीचा विरोध केला जात आहे. आज (1 सप्टेंबर) छगन भुजबळ यांच्या उपस्थित राज्यातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अन्यथा आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ, असा इशाराच भुजबळ यांनी दिला आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा जास्तच तापण्याची शक्यता आहे.
लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकणार
ओबीसी नेत्यांची बैठक झाल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला रस नाही. नियम, कायदा जे सांगतो तेच मी सांगतोय. त्यामुळे उगीचच हट्टाग्रह करत असेल तर सरकारने ते पाहून घ्यावं. पण आम्ही आता ठरवलं आहे. आम्ही उपोषण करणार. आम्ही जिल्ह्याजिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून मिरवणुका काढणार. आमच्यावर अन्याय झाला तर आम्हीसुद्धा लाखोंच्या लोंढ्याने मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच छगन भुजबळ यांनी दिला आहे.
ब्राह्मणांनाही शेती आहे, मग त्यांनाही…
जे बिचारे कुणबी आहे ते कुणबीच आहेत. आम्ही ते मान्य करतो. आमचा यावर कोणताही आक्षेप नाही. मागणी केली म्हणजे संविधान आणि कायदा बाजूला ठेवला जात नाही. कायदा आणि संविधान याप्रमाणाचे निर्णय घेतले जातील. उद्या एखादा म्हणेल की मला दलित समाजात टाका. मला त्यांना मिळणारा फायदा द्या, अशी मागणी कोणी करेल. आजघडीला ब्राह्मणांनाही शेती आहे. त्यामुळे त्यांना कुणबी म्हणता येईल का? असा सवालही भुजबळ यांनी केला.
पत्रकार असो की खासदार…
आंदोलन करायला कोणीही बंधन घालू शकत नाही. पण ते शांततेत, लोकशाही मार्गाने झाले पाहिजे. मी काल ऐकलं की महिला पत्रकारांना त्रास देण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनाही अडवण्यात आले. त्या खासदार आहेत. तब्येतीला जपा असे सांगायला त्या आल्या होत्या. मात्र त्यांना कशी वागणून मिळाली ते सर्वांनीच पाहिले. वार्ताहार असून की खासदार महिलांना अशी वागणूक मिळणे चुकीचे आहे, असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच नियमात आहे त्यानुसार निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात स्थान देऊ नये
ओबीसीमध्ये 374 जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आमच्यामध्ये टाकू नका एवढीच आमची मागणी आहे. मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांनासुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दाखवला, असे सांगत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात स्थान देऊ नये, अशी महत्त्वाची मागणी भुजबळ यांनी केली. त्यामुळे आता भुजबळ यांच्या भूमिकेनंतर सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
