
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीत मदभेद होत असल्याचे समोर आलेले आहे. 70 हजार कोटींचा आरोप होऊन मी आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचे वक्तव्य अजितदादांनी केले होते. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांना यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे आम्ही आणि आमचा पक्ष आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्याविना, विरोधात शिरला तर विरोधात, आम्ही आमचं काम करत राहू असा इशारा दिला होता. यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी, ‘कुणीही जबरदस्तीने विचार लादू शकत नाही, कारण भारत देश संविधानावर चालतो असं म्हटलं आहे. यानंतर आता मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही नेत्यांनी यावर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘वीर सावरकरांच्या विचारांचा अजित दादांनी विरोध करण्याचं कारण नाही. त्यांनी विरोध केल्याचं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. पण आमची भूमिका ही पक्की आहे की, वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार यांनाही याबाबत विचारणा करण्यात आली, यावर बोलताना अजित पवारांना सावध भूमिका घेत थेट टीका करणे टाळले आहे. अजित पवार म्हणाले की, ‘तुम्ही मला विकासाबद्दल विचारा आमच्या महायुतीत अंतर कसे वाढेल, यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. मला फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारावेत. मी ज्या महापालिकेत प्रचारासाठी जाईल, त्याच महापालिकेसंदर्भात मला प्रश्न विचाराला हवेत. इतर प्रश्न विचारले तर मी त्याचे उत्तर देणार नाही. तसेच निवडणुका संपल्यावर मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात अजित पवार या मुद्द्यावर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.