देवगडचा प्रामाणिक मच्छिमार, व्हेल माशाची 5 कोटींची उलटी वन विभागाला सुपूर्द

देवगडमध्ये सापडलेली व्हेल माशाची ही उलटी पाच किलो वजनाची असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

देवगडचा प्रामाणिक मच्छिमार, व्हेल माशाची 5 कोटींची उलटी वन विभागाला सुपूर्द
सिंधुदुर्गात समुद्र किनारी सापडलेली देवमाशाची उलटी

सिंधुदुर्ग : व्हेल माशाच्या उलटीची (Whale Vomit) म्हणजेच अंबरग्रिसची (Ambergris) तस्करी करणारे रॅकेट नुकतेच ठाण्यात पकडले असतानाच सिंधुदुर्गातील देवगडमध्येही एका मच्छिमाराला किनाऱ्यावर व्हेल माशाची उलटी सापडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीला सोन्याचा भाव आहे, मात्र मच्छिमाराने प्रामाणिकपणा दाखवत ही उलटी वनविभागाच्या ताब्यात दिली.

नेमकं काय घडलं?

प्रामाणिक मच्छिमाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवगड तारामुंबरी येथील समुद्र किनाऱ्यावर उमाकांत कुबल यांना एक मेणासारखा पदार्थ कुत्रे खात असल्याचे निदर्शनास आले. कुतूहल म्हणून त्यांनी तो पदार्थ घरी आणला आणि त्याचे फोटो मुंबई स्थित मत्स्य संशोधन संस्थेत काम करणाऱ्या मित्राला पाठवले. प्रथमदर्शनी हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे त्या मित्राने सांगितले.

मित्राच्या सूचनेनंतर वन विभागाला फोन

या उलटीची तस्करी केली जाते त्यामुळे याची माहिती वन विभागाला देण्याची सुचना मित्राने केली. त्यानुसार सूचना मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तो पदार्थ ताब्यात घेतला आहे. तो पदार्थ आता पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

मच्छिमाराचा सत्कार करण्याची मागणी

देवगडमध्ये सापडलेली व्हेल माशाची ही उलटी पाच किलो वजनाची असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या त्या मच्छिमाराचा यथोचित सत्कार शासनाने करावा अशी मागणी होत आहे.

देवमाशाची उलटी म्हणजेच अ‍ॅम्बरग्रिस हे परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यात वापरले जाते. ते खूप महाग किंमतीने विकले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याची तस्करी करुन छुप्या पद्धतीने खरेदी-विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संबंधित बातम्या

मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

(Sindhudurg Honest Fisherman found Whale Vomit aka Ambergris worth 5 crore)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI