अजितदादा भाजपावर टीका का करतात? CM फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण, वाचा…

Fadnavis on Ajit Pawar : आज पुण्यात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गिरिजा ओक यांनी अजित पवार महापालिकांच्या प्रचारात भाजपवर टीका का करतात? असा प्रश्न विचारला होता. याला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

अजितदादा भाजपावर टीका का करतात? CM फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण, वाचा...
Fadnavis and Ajit Pawar
Image Credit source: Google
| Updated on: Jan 11, 2026 | 10:10 PM

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आज पुण्यात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गिरिजा ओक यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यात एक प्रश्न असा होता की राज्यात सत्तेत असणारे अजित पवार महापालिकांच्या प्रचारात भाजपवर टीका का करतात? यामागील नेमकं कारण फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते नेमकं काय काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

अजित पवार टीका का करतात?

या मुलाखतीच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणताय देवा भाऊ असं विचारण्यात आलं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘देवाभाऊ काही म्हणत नाही. देवाभाऊचं काम बोलतं.’ त्यानंतर गिरिजा ओक यांनी त्यांना तुमचं काम बोलतं मग अजितदादा टीका करतात? याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अजितदादा बोलतात. माझं काम बोलतं. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढू शकत नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. कारण दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. आपण जिथे एकमेकांविरोधात लढत आहोत. तर मैत्रीपूर्ण लढत आहोत. एकमेकांवर टीका करू नये. मी हा संयम पाळला. दादांचा संयम ढळला आहे. पण 15 तारखेनंतर नाही बोलणार.’

ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य

मुलाखतीत पुढे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले ती, ‘कोणताही परिवार एकत्र येत असेल तर आनंद आहे. त्याबाबत मी राज ठाकरेंचे आभार मानतो त्यांनी मला क्रेडिट दिलं. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांनी प्रयत्न केला. दोन भाऊ एकत्र आले नाही. पण मी आणले. त्यामुळे मला बाळासाहेब आशीर्वादच देतील. पण दोन भाऊ बहीण एकत्र येणार का हे माहीत नाही. 15 तारखेनंतर करेल.’

मोफत प्रवासावर भाष्य

पुण्यात अजित पवारांनी महिलांना मेट्रोतून फुकट प्रवास करण्याची घोषणा केली. याबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातून उड्डाण करणाऱ्या महिलांना विमानातून मोफत प्रवास करता येईल. (मिश्कीलपणे) अनाऊन्स करायला काय जातं. घोषणाच करायची ना. आपण अजेंडा तयार करतो. काहीही आश्वासन देतो. पण ते पटलं पाहिजे ना. मेट्रो ही काय एकट्या पुण्याची नाही. केंद्र आणि राज्य सरकारचीही आहे. फेयर सिस्टिम तिकीटाचे दर ठरवते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याची आश्वासने का द्यायची. पुणेकरांना मोफत नको. रिलायबल आणि डिपेंडेबल हवे आहे. त्यांना उत्तम सेवा हवी आहे. ही सेवा चांगली झाली पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. हे आश्वासन पुणेकरांनी समजलं आहे.’