जावई प्रांजल खेवलकरच्या रेव्ह पार्टीवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, थेट सांगितले A टू Z
Eknath Khadse on Rave party : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली असता खडसेंचे जावई सापडले. यामुळे आता राजकारणात मोठा भूकंप आलाय.

जळगाव : पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टीने राजकारणात मोठा भूकंप आला. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले. यानंतर खडसे काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी खडसे हे माध्यमांच्या पुढे आले असून त्यांनी म्हटले की, सध्या ज्याप्रकारे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काही घडू शकते, असा अंदाज मला अगोदरपासून होता. मी फारसं बोलणार नाही. पण अलिकडे पुण्यात ज्याकाही घटना घडल्या आहेत, ते मी फक्त चॅनलवरून पाहिले.
पुढे एकनाथ खडले म्हणाले, माझं त्यांच्याशी प्रत्यक्ष अजून काही बोलणे होऊ शकले नाहीये, कारण ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि पोलिसांच्या ताब्यात आहेत. माझं याबद्दल म्हणणे आहे की, जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीमध्ये आमचे जावई त्याठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्याठिकाणी त्यांच समर्थन करणार नाही. पण पोलिस यंत्रणेने याठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा.
कारण बऱ्याचदा असे होते की, पोलिस काहीही करू शकतात, अशी भावना जनमाणसांमध्ये आहे. त्या प्रकरणात नीट फ्रॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजेत, ब्लॅड रिपोर्ट आले पाहिजेत आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं चुकीचं राहिलं. नंतरही मी पत्रकार परिषद घेईल. आपण हे देखील बघितले पाहिजे की, हे प्रकरण कशापद्धतीने घडवले जातंय किंवा घडले. पण तथ्थ समोर येईल.
यामध्ये जावई असो किंवा अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे. पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सहन केले जाणार नाही आणि निश्चितपणे याचा विरोध करू, असे खडसेंनी म्हटले आहे. या रेव्ह पार्टीत थेट जावईच सापडल्याने नाथाभाऊ पुन्हा अडचणीत आल्याचे बोलले जातंय. प्रांजल खेवलकर यांना या पार्टीतून ताब्यात घेतले असून त्यांचे मेडिकल करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
