Ajit Pawar Funeral: कंठ दाटला, डोळ्यात धारा…अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अलोट जनसागर
Ajit Pawar Last Rituals: उपमुख्यमंत्री अजितदादांची अकाली एक्झिट संपूर्ण राज्याला चटका लावून गेली. अनेकांचे डोळे पाणावले. डोळ्याच्या कडा पाणावल्या. हंबरडा फुटला तर अनेक जण सैरभैर झाले. एका माणसानं अनेकांना घडवलं. त्या आठवणीचा सांगावा घेऊन अनेक जण आज काटेवाडीत दाखल झाले. त्यावेळी त्यांना भावना आवरता आल्या नाहीत.

Ajit Pawar Funeral: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अचानक एक्झिट राज्याला चटका लावून गेली. अनेकांची मनं कालपासून सैरभैर झाली. छत्र गमावल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेक कार्यकर्ते, नेते, पुढारी आपण पोरकं झाल्याची प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांचे डोळे पाणावले आहेत. डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. अनेकांना उभं करणारं हे उमदं नेतृत्व महाराष्ट्राला पोरकं करून गेलं. काटेवाडीत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अलोट जनसागर उसळला. ज्याच्या त्याच्या तोंडी असा नेता होणे नाही हीच एक प्रतिक्रिया उमटत होती.
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून जनसागर लोटला. लोक मिळेल त्या वाहनाने, जमेल त्या साधनांचा वापर करत काटेवाडीत दाखल झाले. काटेवाडीत पाय ठेवायलाही जागा नव्हती. काही किलोमीटरपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतची लोक काटेवाडीत दाखल झाली होती. कालपासूनच राज्याच्या कान्याकोपऱ्यातून लोक इथं दाखल झाली. अजितदादांचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठी मोठी गर्दी होती. लांबच लांब रांगा होत्या. अजितदादा अमर रहे…अजितदादा परत या..नारे कार्यकर्ते देत होते. यावेळी वातावरण भावूक झाले होते. अनेकांचा कंठ दाटून आला होता. काहींना शब्द फुटत नव्हते. काहींना अश्रू अनावर झाले होते. प्रत्येक जण दादांची आठवण काढत होता. दादांनी त्यांच्या गावासाठी, भागासाठी कोणती योजना दिली. त्यामुळे भागाचा कसा कायापालट झाला याच्याबद्दल जो तो बोलत होता.
मोठी गर्दी झाली होती. अनेक तरुणांचे डोळे पाणावले. महिला विलाप करत होत्या. काहींना काय बोलावे हेच सूचत नव्हते. दादा आपल्यात नाही हीच भावना काहींसाठी धक्कादायक होती. ६५ वर्षांचे गणपत ठोंबरे यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. आता २४ तास उलटून गेले. पण दादा आपल्यातून निघून गेले हे मनाला पटत नसल्याचे ते म्हणाले. अजूनही असं वाटतंय की दादा आपल्यातच आहेत. असा नेता पुन्हा होणे नाही. अजितदादांनी राजकारणात अनेक मोठी पदं भूषवली पण ते कधी गावकरी आणि गावाला विसरले नाहीत. दादा गावकऱ्यांच्या छोट्या-मोठ्या अचडणी सोडवायचे. कामचुकारपणा त्यांना खपायचा नाही असं म्हणताना ठोंबरेचे डोळे पाणावले. त्यांना हुंदका आवरता आला नाही.
मुलीचा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश असो की लग्नाच्या खर्चाची अडचण, गावातील काही काम, योजना रखडली असो दादांच्या कानावर गेलं की ते काम झाल्याशिवाय राहायचं नाही. दादांनी एकदा शब्द दिला म्हणजे ते काम पक्क होणार ही खात्री लोकांना असायची. जे काम होणार नाही, त्याला ते थेट नाही म्हणायचे. दादांचा हा फटकळ स्वभावही अनेकांना आवडायचा. धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील चंद्रकांत माळी म्हणाले की राज्याने आज हिरा गमावला आहे. असा नेते पुन्हा पुन्हा होत नाही. अजितदादांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला. चांगले रस्ते, पूल, सिंचन योजना याबाबतीत त्यांचा दूरदर्शीपणा याची चर्चा होत होती. अनेक जण भावूक झाले होते. अनेकांचा कंठ दाटून आला होता.
