Ajit Pawar Final Ritual: दादा, राखी बांधता आली नाही; महिलेच्या टाहोने अनेकांना आले गलबलून, अश्रूंचा फुटला बांध
Maharashtra DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजितदादांचे काल झालेल्या विमान अपघातात निधन झाले. राज्याला हा मोठा धक्का होता. मित्र, सहकारी, कार्यकर्ते सर्वांनाच गलबलून आले. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर आज अखेरचा निरोप देण्यासाठी काटेवाडीला प्रचंड जनसमुदाय लोटाला. यावेळी महिलांना भावनांना आवर घालता आली नाही.

Ajit Pawar Funeral: उपमुख्यमंत्री अजितदादांचे काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. राज्याला हा मोठा धक्का होता. दादांचे सहकारी, त्यांचे मित्र, कार्यकर्ते, पदाधिकारीच नाही तर सर्वसामान्यांच्या मनाला ही एक्झिट चटका लावून गेली. उभा महाराष्ट्र हळहळला. आज दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या मूळ गावी काटेवाडीला प्रचंड जनसमुदाय लोटला. यावेळी महिलांना अश्रू अनावर झाले. आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाडक्या बहिणी आल्या आहेत. त्यांच्या आर्त दाहोमुळे अनेकांना गलबलून आले. हुंदके, आक्रोश आणि घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.
लाडक्या बहिणींचा टाहो
यावेळी एक महिला, लाडके दादा सोडून गेल्याने आक्रोश करताना दिसली. दादा, राखी बांधता आली नाही, या तिच्या शब्दांनी वातावरणातील स्तब्धता चिरल्या गेली. दर्शनासाठी आलेल्या अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. दादांनी अनेकांना कशी मदत केली. त्यांनी कसं सहकार्य केलं. त्यांचं कोणतं काम मार्गी लावलं. याची चर्चा सुरू होती. तर यावेळी लाडक्या बहिणींनी दादांची आठवण काढली. गेल्या वर्षी विधानभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली आणि ही योजना राज्यात लोकप्रिय झाली. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी आला.
अजितदादांच्या प्रचारावेळी लाडकी बहीण योजना आणि गुलाबी थीम फार गाजली. या योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं दादा अनेकदा सभेतून सांगत. लाडक्या बहिणीसाठी अजितदादा हे हक्काचे भाऊ होते. अनेकदा या योजनेतील अडचणी आणि तक्रारीचा पाढा महिलांनी वाचल्यावर दादांनी तातडीने या तक्रारी सोडवण्यास सांगितले. महिला आणि बाल कल्याण खाते हे त्यांच्याच पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे आहे. लाडक्या बहिणींसाठी अजितदादा हे जणू आधारवड होते. बारामती या त्यांच्या विधानसभा क्षेत्रातच नाही तर राज्यात दादांचा कामाचा मोठा झपाटा होता. आज हा आधारवड आपल्यातून काळाने हिरावल्याची जाणीव या महिलांच्या काळजाला चटका लावून जात होती. त्यातच एका महिलेने राखी आणून दादांना राखी बांधायची इच्छा अपूर्ण राहिल्याचे सांगत टाहो फोडला. त्यावेळी अनेकांना गलबलून आले. अनेकांनी आवरलेले हुंदक्यांना वाट मोकळी करून दिली. एकच गलका झाला. रडारड आणि पळापळ झाली. उपस्थित सर्वच जण या माऊलीमुळे गहिवरले. अशाच भावना उपस्थितांकडून व्यक्त होत होत्या.
भीषण अपघाताने लोकनेता हिरावला
काल सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. विमान थेट जवळच्या शेतात जाऊन आदळले आणि एकामागून एक स्फोट झाले. यामध्ये लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह इतर पाच जणांना काळाने हिरावले. या वृत्ताने राज्याला मोठा धक्का बसला. राज्यातील अनेकांनी थेट बारामती आणि काटेवाडीकडे धाव घेतली. आता अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे.
