Nilesh Ghaywal : निलेश घायवळविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस, रवींद्र धंगेकर उतरले मैदानात, पुण्यात महायुतीत शिमगा?
Ravindra Dangekar on Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळ याच्या अडणीत वाढ झाली आहे. तो परदेशात लपून बसला असला तरी आता त्याचा ठावठिकाणा माहिती होणार आहे. त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

Nilesh Ghaiwal Blue corner Notice : पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. घायवळ परदेशात लपून बसला आहे. आता त्याचा ठावठिकाणा पोलिसांना माहिती पडेल. त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजे इंटरपोलकडून घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे निलेश घायवळ याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आता ठावठिकाणा माहिती होणार
पुणे पोलिसांनी इंटरपोलशी याविषयीचा पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर ही ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली. घायवळ सध्या कुठं दडून बसला आहे त्याविषयीची अतिरिक्त माहिती, त्या ठिकाणाची ओळख, त्याचा ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस देण्यात आली आहे. निलेश घायवळ याने पासपोर्टसाठी अडनावात बदल केला आणि अहिल्यानगर येथून पासपोर्टसाठी अर्ज केल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून राजकारण तापले आहे.
रवींद्र धंगेकर मैदानात
शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी याप्रकरणात भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. निलेश गायवळ ज्या पद्धतीने दादागिरी करतोय खोटा पासपोर्ट केला लोकांचे मुडदे पाडले किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचं धाडस होत चालला आहे, असा गंभीर आरोप आज धंगेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला. समीर पाटील ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये जातो त्यावेळेस दादांच्या जवळचा असल्यामुळे तो पोलिसांवर दबाव टाकतो, असा दावा त्यांनी केला. गुन्हेगारीची सिस्टीम रन करताना समीर पाटील दिसत आहे. समीर पाटीलची माहिती घेतली असता त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती चीटिंगचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर मोक्का सुद्धा आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.
चंद्रकांतदादांवर पुन्हा हल्लाबोल
कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी चालते रोज मुडदे पडतात रिवाल्वर निघतायेत तुम्ही तिथले लोक प्रतिनिधी आहात. त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय तुम्ही म्हणा एकदा की आम्ही त्यांचा खालसाचा करू. तुम्ही गौतमी पाटील ची कशी ॲक्शन केली की उचला हिला तसं तुम्ही ह्यांना का उचला असं म्हणत नाहीत, असा हल्लाबोल रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.
चंद्रकांत पाटील तुम्ही त्यांना घाबरत आहे का? संघाचा कार्यकर्ता सुद्धा मला म्हणत होता की भाऊ तुम्ही बोलता येते बरोबर बोलताय गुन्हेगारीचं कड जर ह्यांच्या भोवती असेल कसं होणार. पुण्यातील गुन्हेगारी संदर्भात आज एकनाथ शिंदे यांना भेटून माहिती देणार आहे. पुणेकरांचा आवाज म्हणून रवींद्र धंगेकर गुन्हेगारीवरती बोलत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुण्यात भाजप-शिवसेनेत शिमगोत्सव राहिल असे दिसते.
अजितदादांवर धंगेकरांचा पलटवार
गुन्हेगारी आणि निलेश गायवळ वरती बोलत असताना भाजप नेते किंवा पालकमंत्री अजित पवार पाठीशी उभे राहताना दिसत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सिस्टीम मध्ये कोण ऐकत असेल असं वाटत नाही, असा पलटवार धंगेकर यांनी कालच्या अजितदादांच्या विधानानंतर केले. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील याच्या संदर्भातील गुन्ह्यांची नोंद असलेले कागदपत्रे मी आणले आहेत. पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे ही गुन्हेगारी मोडीत काढताना किंवा त्या संदर्भात वक्तव्य करताना नेते मंडळी दिसत नाहीत, असेही धंगेकर म्हणाले.
