बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, अजित पवारांकडून पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम तयारीचा आढावा

बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही सांगितले. (Ajit Pawar on kharif season preparations)

बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, अजित पवारांकडून पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम तयारीचा आढावा
ajit pawar

पुणे : खरीप हंगामामध्ये बी – बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. त्याशिवाय एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. (Ajit Pawar Meeting Review of kharif season preparations)

अजित पवारांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी खरीप हंगामासाठी लागणारे बी – बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेतला. तसेच संबंधित यंत्रणांला विविध निर्देश दिले.

अजित पवारांच्या सूचना 

पुणे जिल्ह्यात 2 लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, सोयाबीन यांचा समावेश आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कृषी निविष्टा यांची कमतरता भासणार नाही. तसेच कृषी विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत आणि बियाणांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना अजित पवारांनी दिली आहे.

तसेच खतांच्या आणि बियाणांच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याशिवाय ऊस पाचट अभियानाची अंमलबजावणी, भात पिकांमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर, हुमणी नियंत्रण, यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देशही अजित पवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेने करा

त्याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्रात फळबाग लागवड करावी. आंबा लागवडीसाठी मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना कलमे उपलब्ध करून द्यावीत. तसेच बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेने करावी, असेही सांगितले.

पुणे जिल्हाधिकारी खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा खरीप हंगाम 2021 च्या नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दोन लाख 19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रासाठी 26 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी आजपर्यंत 4 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. आवश्यकतेप्रमाणे पुरवठा सुरूच आहे. शेतक-यांनी सोयाबीन बियाण्याबाबत घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून वापर करावा. खतांमध्ये एक लाख ८५ हजार मेट्रिक टनाची मंजूर असून मागील हंगामातील ९० हजार मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. चालू वर्षी २५ हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला असून एकूण एक लाख १५ हजार मेट्रिक टन खतांची उपलब्ध्ता आहे. तथापी शेतक-यांनी माती परिक्षणानुसार दिलेल्या शिफारसीप्रमाणे खताचा वापर करावा. खरीपाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे, असे ते म्हणाले.

विविध योजनांबाबत सविस्तर माहिती 

यावेळी खत व मागणी पुरवठा, कृषी निविष्टा विक्रेत्यांची संख्या खरीप हंगाम क्षेत्र, कृषी निविष्टा व गुण नियंत्रण, पिक कर्ज वाटप, सिंचन नियोजन, शेती पंपाना विज पुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना इत्यादींसह कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.  (Ajit Pawar Meeting Review of kharif season preparations)

संबंधित बातम्या : 

कोरोनाशी लढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या; मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत: नवाब मलिक

चौथ्यांदा आमदार, हत्येचाही आरोप; वाचा, कोण आहेत किसन कथोरे?

Published On - 2:48 pm, Fri, 7 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI