17 सप्टेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप? काय होणार? अखेर संजय राऊत काय म्हणाले?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी १७ सप्टेंबरला मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशीच भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळली असून, चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला आहे. संघाने उपपंतप्रधानपदाची मागणी केल्याने मोदींच्या पतनाची सुरुवात झाली असून, त्यांचे वर्चस्व संपुष्टात येत असल्याचा दावा राऊत यांनी केला.

येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. पण पहिल्यांदाच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. चार मंत्र्यांनी राजीनामे देण्यास नकार दिल्याने मोदी सरकारचा विस्तार थांबला आहे. ही भाजपच्या अध:पतनाची सुरुवात आहे. त्यातच संघानेही उपपंतप्रधानपदावर मोदींचा वारस बसवण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडी बरंच काही सांगून जातात, असं सूचक विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत कोल्हापुरात होते. दिनमान साहित्य उत्सव पर्व 2ला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी हे सूचक विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. तुम्ही वारंवार सप्टेंबरमध्ये मोठं काही घडणार असल्याचा दावा करत असता, काय घडणार आहे सप्टेंबरमध्ये असं? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट भाजपच्या अंतर्गत बंडाळीवर बोट ठेवून पक्षातील मोदी आणि शाह यांचा वर्चस्व संपुष्टात आल्याचं अधोरेखित केलं.
मंत्र्यांचा स्पष्ट नकार
सप्टेंबर आला आहे, येऊ द्या. मी 17 सप्टेंबरची तारीख दिली आहे. या दिवशी मोदींचा वाढदिवस आहे. या क्षणी भाजपात पहिल्यांदाच बंडाळीचं स्वरुप वाढलं आहे. गेल्या 10 वर्षात ते नव्हतं. पक्षात मोदी आणि शाह यांची दहशत होती. ती आता नाहीये. त्यामुळेच मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदल करू शकले नाहीत. जुने मोदी असते तर मोडून तोडून बरखास्त केले असते. पण चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. हे चारही मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे, असं राऊत म्हणाले.
भाजपात बंड वाढणार
मोठा फेरबदल करायचा असतो तेव्हा मंत्र्यांचे राजीनामा घेतात. मंत्र्यांची राजीनामे घेतल्यानंतर फेरबदल केला जातो. पण या मंत्र्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही राजीनामा का द्यायचा? याचं उत्तर द्या. आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या. त्यांना वगळून आम्ही राजीनामे का द्यायचे? असा सवाल हे मंत्री करत आहेत. मोदींच्या पतनाची ही सुरुवात आहे. हळूहळू बंड वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.
मोदींच्या पतनाची सुरुवात
संघालाही आता एक नवीन ऊर्जा प्राप्त होताना दिसत आहे. त्यांनी फेरबदलात उपपंतप्रधान नियुक्त करण्याची मागणी केली आहे. हा उपपंतप्रधान तुमचा वारस असेल असं त्यांनी म्हटलंय. तो वारस अमित शाह नसणार. संघाचं हे सांगणं आणि त्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार रोखून ठेवणं याचा अर्थ मोदींची दहशत, अमित शाहांच्या दादागिरीला ब्रेक लावण्याचं काम सुरू झालं आहे. इंटरनॅशनल फोर्सेसचं भारतावर लक्ष आहे. त्यांना मोदींचं ओझं झालंय. हा भंपक माणूस आहे. थापाड्या आहे. खोटरडा आहे, याच्यावर जगाचं एकमत झालं आहे. त्यामुळे मी सांगतो मोदींच्या पतनाची सुरुवात सुरू होत आहे. एकदा पतन सुरू झालं की गाडीचा वेग कमी होऊन गाडी खाली जाणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
