‘राष्ट्रवादी’ हातून गेल्यावर 5 दिवसानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अध्यक्ष असताना…
भाजप विरोधात भूमिका घेतली तर सत्तेचा गैरवापर केला जातो. याच्या आधी ईडी हा शब्द माहिती नव्हता. आता देशाच्या कानाकोपऱ्यात हा शब्द गेलाय. ईडीचा गैरवापर केला जातोय, सहा हजार केसेस झाल्या आहेत. ईडीचे बजेट 404 कोटींचे झाले, एवढा खर्च करून काय साध्य केलं? यामध्ये 85 टक्के केसेस या विरोधी पक्षांवर होत्या, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले.

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 11 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. त्यामुळे अजितदादा गटात प्रचंड जल्लोष आहे. तर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आयोगाच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून आणि इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. पण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आज तब्बल पाच दिवसानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, बैलजोडीवर मी पहिली निवडणुकीवर लढलो. आमचं दोन वेळा चिन्ह गेलेलं आहे, चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असतं, असं सांगतानाच निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्याला सोडून दुसऱ्याला पक्ष देण्यात आला. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष असताना दुसऱ्याला पक्ष दिला गेला हे पहिल्यांदाच घडलं आहे. जनता या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाही. सुप्रीम कोर्ट याबाबत योग्य तो निकाल देईल, असं शरद पवार म्हणाले.
मी निवडणूकच लढणार नाही
काही लोक भावनिक करून निवडणूक लढवतील. मते मागतील. त्यांच्या आवाहनाला बळी पडू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे भावनात्मक बोलणं योग्य नाही. बारामतीची लोक चोखंदळ आहेत. बारामतीत केलेल्या कामाला लोकांनी पावती दिलेली आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
लोक धडा शिकवतील
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका जाणकार व्यक्तीवर हल्ला केला गेला. महाराष्ट्रातील हल्ला करणाऱ्या या प्रवृत्तीला महाराष्ट्र योग्य धडा देईल. राजकीय पक्षांनी अधिक गंभीरतेनं हे घ्यायला पाहिजे, असं सांगतानाच विरोधी पक्षातील नेत्यांनी राजीनामा मागणं हे त्यांचं काम आहे, असंही ते म्हणाले.
त्यात एकाही भाजप नेत्याचं नाव नाही
ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्यामध्ये एकाही भाजपच्या नेत्याचे नाव नाही. अधिकारचा गैरवापर फक्त त्यांच्या मनाच्या विरोधात जाणाऱ्यांवरच होतोय. यासंदर्भात आपल्याला जनमत तयार करावं लागेल. काही लोक म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो, विकासासाठी गेलो हे म्हणणं यामध्ये यत्किंचत सत्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
