Maharashtra Politics : आदिती तटकरे की भरत गोगावले? रायगडचं पालकमंत्रिपद कुणाकडे? जाणून घ्या
Raigad Guardian Minister : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चढाओढ पाहायला मिळत होती. अखेर पालक मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे रायगडचा पालकमंत्री कोण? या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. मात्र आता अखेर ही यादी जाहीर झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता. राष्ट्रवादीच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यात थेट स्पर्धा होती. भरतशेठ यांनी अनेकदा पालकमंत्रिपदावर दावा ठोकला होता. मात्र अखेर आदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत.
जवळपास 2 महिन्यांनंतर यादी
राज्यात महायुतीचं 23 नोव्हेंबर रोजी सरकार आलं. राज्यातील जनेतेने महायुतीला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा 5 डिसेंबर रोजी नागपुरात शपथविधी पार पडला. मंत्र्यांनी पदभार स्वीकारला. मात्र कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायचं? हे निश्चित होत नव्हतं. अखेर हा तिढा सुटलाय. आता 18 जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालीय.
आदिती तटकरे यांनी राय’गड’ राखला
भरतशेठ गोगावले रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. भरतशेठ गोगावले यांनी एकदा पालकमंत्रिपदावरुन बोलताना अजब वक्तव्य केलं होतं. “आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्यांच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?” असं अजब वक्तव्य गोगावले यांनी केलं होतं. यावरुन चांगलाच वादही रंगला होता.
कुणाकडे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असणार आहेत. तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बहुचर्चित बीड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री, #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री. pic.twitter.com/vS41qTcot4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 18, 2025
मुंबई उपनगराची जबाबदारी कुणाकडे?
दरम्यान मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी ही आशिष शेलार यांच्याकडे आहे. तर मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह-पालकमंत्री असणार आहेत.