‘उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील’, अंबादास दानवे यांचं कार्यकर्त्यांसमोर मोठं वक्तव्य
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडीला देशात बहुमत आलं तर उद्धव ठाकरे हे देशाचे नवे पंतप्रधान होतील, असं मोठं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. इंडिया आघाडीला देशात बहुमत आलं तर उद्धव ठाकरे हे देशाचे नवे पंतप्रधान होतील, असं मोठं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या दोन्ही नेत्यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना नियोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं. “परवा इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये असं म्हणतात की, देशात इंडिया आघाडीला मेजॉरिटी आली तर पंतप्रधान उद्धवजी ठाकरे होतील”, असं मोठं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
“सकाळची वेळ सर्वांनी पाळली पाहिजे. सगळ्यांना संपर्क केला जाईल. परवा इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये असं म्हणतात की, देशात इंडिया आघाडीला मेजॉरिटी आली तर पंतप्रधान उद्धवजी ठाकरे होतील. मला वाटतं, सर्व शिवसैनिकांना याच्यासारखा आनंद होणारा कोणताही क्षण नसेल. शिवसेना संपली, नकली शिवसेना, असं म्हणताय. पण हीच शिवसेना देशाचं नेतृत्व करेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.
“राज्याचे डीजी आहेत, त्यांना भेटायला गेलो होतो. ॲडिशनल डीजी आहेत, त्यांना देखील भेटलो. हे चार जण होती. त्यातला एकही माणूस असं म्हटला नाही की तुम्ही हारणार आहेत. ते उलट म्हटले की, येणारा काळ तुमचा आहे. अनेक सर्व्हे येत आहेत. सर्व्हेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या जागा दाखवल्या जातात. एका सर्व्हेमध्ये तर 17 ते 18 जागा दाखवल्या आहेत. आपल्यातले गद्दार गेले ते म्हणजे आपल्यातली घाण गेली. येणाऱ्या काळात या संभाजीनगर लोकसभेच्या विजयातून मराठवाड्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आपण नक्की काम करू”, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.